आरटीओ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती यादीत लाचखोर आणि फौजदारी गुन्हेगारांची नावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 14:35 IST2026-02-14T14:34:00+5:302026-02-14T14:35:53+5:30
Amravati : राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; मंत्रालयातील परिवहन खात्यातही पोहोचला ‘जी फार्म’

Names of bribe-takers and criminal offenders in the promotion list of RTO officers
अमरावती : राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागाने उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यासंदर्भात ४० जणांची यादी अधिसूचनाद्वारे प्रसिद्ध केली आहे. मात्र, यात पाच ते सहा आरटीओ अधिकाऱ्यांवर लाचखोरी, फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असताना या आरटीओंची नावे पदोन्नतीत आली कशी? हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे मंत्रालयातील परिवहन विभागात सुद्धा ‘जी फार्म’ पोहोचल्याची शंका उपस्थित होत आहे.
राज्याच्या (गृह विभाग) विभागाने ९ फेब्रुवारी २०२६ रोजी नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, कोकण-१, कोकण-२, पुणे या महसूल विभागासाठी ४० आरटीओंना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यासाठी यादी प्रसिद्ध केली आहे.
मात्र यात पाच ते सहा अधिकाऱ्यांवर लाचखोरी, फौजदारी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहे, तसा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिवहन विभागाकडे पाठविला होता. मात्र, हा अहवाल परिवहन विभागाने शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला नाही. लाचखोरी, फौजदारी गुन्हे दाखल असलेला अहवाल दडविण्यामागे परिवहन विभागाचे कारण काय?, असे प्रश्न उपस्थित होत आहे. यात विदर्भातील नागपूर, गोंदिया, अमरावती येथे कर्तव्य बजावणारे आरटीओ यांची देखील पदोन्नतीच्या यादीत नाव असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या पदोन्नती यादीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे परिवहन विभागाचे उपसचिव चेतन निकम यांनी सांगितले.
परिवहन आयुक्त कार्यालय संशयाच्या भोवऱ्यात
पदोन्नती यादीतील पाच ते सहा आरटीओंवर लाचखोरी, विभागीय चौकशी, फौजदारी अशा विविध प्रकारची गुन्हे दाखल आहेत. मात्र ‘जी फार्म’मुळे परिवहन आयुक्त कार्यालयाने पदोन्नती यादीतील अधिकाऱ्यांचा गाेपनीय अहवाल दडवून ठेवल्याची शंका बळावली आहे. कारण परिवहन विभागात चांद्यापासून, तर बांध्यापर्यंत ‘जी फार्म’ प्रचलित असून, देवाण-घेवाण झाली की ‘सब कुछ ओके’ असा कारभार आरटीओत चालतो, हे सर्वश्रुत आहे.
ही आहेत पदोन्नतीतील अधिकाऱ्यांची नावे
मनोज ओतारी, सचिनकुमार गिरी, श्रीकृष्ण नकाते, स्वप्नील माने, सिद्धार्थ ठोके, निखील सांळुखे, सुजीत डोंगरजाळ, पवन नव्हाळे, प्रसाद नलवडे, योगेश ताटु, विजय शेळके, प्रशांत साळी, सचिन विधाते, प्रवीण बागडे, सतीश जाधव, गजानन ठोंबरे, उत्तम जाधव, चारूदत्त व्यवहारे, राजेंद्र केसकर, अमर देसाई, कैलास कोठावदे, गणेश पाटील, सुरेश आव्हाड, दीपक शिंदे, विनोद साळवी, गजानन गावंडे, विलास चौधरी, अमरसिंह गवारे, विजय ईंगवले, युवराज पाटील, संदीप म्हेत्रे, आनंद मेश्राम, रावसाहे रगडे, निलेश धोटे, अजित ताम्हणकर, शाम कासार, माधव सूर्यवंशी, नंदिकशोर काळे, संदीप निमसे, मनीष दौंड.
पदोन्नती यादीतही ‘फिक्सींग’
कोणत्याही विभागात अधिकाऱ्यांची पदोन्नती यादी प्रसिद्ध करताना मेरीट लिस्ट प्रकाशित केली जाते. पदोन्नती यादीतील नावे ही जास्त असतात. मात्र आरटीओ अधिकाऱ्यांना उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून पदोन्नती देताना केवळ ४० जणांचीच अंतिम यादी अधिसूचनेद्वारे प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या पदोन्नती यादीतही ‘फिक्सींग’ असल्याचे बोलले जात आहे.