नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 14:56 IST2025-09-15T14:27:08+5:302025-09-15T14:56:14+5:30
Amravati : टोल फ्री क्रमांकावर कॉल लावूनही समस्या कायम

Nagpur Highway Toll Plaza scam! Bank deducts toll while tolls are pending
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अमरावती ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पेठ आणि कारंजा या दोन टोल प्लाझा नाक्यावर एकाच क्रॉसिंगचे दोन वेळा शुल्क कपात करण्यात आल्याची धक्कादायक बाब शनिवार, १३ सप्टेंबर रोजी निर्दशनास आली आहे. वाहनचालकांकडे वार्षिक पास असताना एकाच क्रॉसिंगवर दोनदा शुल्क कपात होत असल्याबाबत टोल फ्री क्रमांकावरही तक्रार करण्यात आली. मात्र, याचा काहीही फायदा झाला नाही. ऑनलाइन शुल्क कपात होऊन वाहनधारकांना फटका बसला, हे विशेष.
टोल फ्री क्रमांकावर केलेल्या तक्रारीनुसार, कारंजा घाडगे या टोल नाक्यावरून १३ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजून १७ मिनिटांनी वार्षिक पासधारक एमएच २७ डीई ९४९८ या क्रमांकाच्या वाहनाने क्रॉसिंग केले. मात्र, १९४ फेऱ्या शिल्लक असताना बँक खात्यातून शुल्क कपात करण्यात आले. या अफलातून प्रकाराने संबंधित वाहनधारक हैराण झाले. तेव्हा त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या १०३३ या टोल फ्री हेल्पलाइनवर कॉल केला. मात्र, ऑनलाइन तक्रार नोंदविली, लवकरच समस्या निकाली काढू, असे सांगण्यात आले. पुढे हेच वाहन नांदगाव टोल प्लाझा येथे १० वाजून २६ मिनिटांनी क्रॉसिंग झाले असता १९५ फेरी लेफ्ट झाले, असे दर्शविले.
खरे तर वार्षिक टोल क्रॉसिंग पास असताना एकाच क्रॉसींगवर दोनदा शुल्क कपात 'ये बात कुछ हजम नहीं' असाच काहीस प्रकार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून निरंतरपणे सुरू असल्याची ओरड वाहनचालकांची आहे. वार्षिक टोल पास हाताळणे सुलभ व्हावे, यासाठी ही सुविधा आहे. मात्र, नांदगाव पेठ आणि कारंजा घाडगे या टोल प्लाझावर एकदा वाहन क्रॉसिंग झाल्यानंतर दोनदा ऑनलाइन शुल्क कपात झाल्याने वाहनधारक त्रस्त झाले आहेत. अमरावती ते नागपूर या मार्गावर ३ टोल प्लाझा नाके आहेत. यात गोंडखैरी / कोंडाली, कारंजा घाडगे आणि नांदगाव पेठ या नाक्याचा समावेश आहे. यासंदर्भात नागपूर येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता गजानन पळसकर यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही, हे विशेष.
वाहनचालकांच्या तक्रारी, समस्यांकडे दुर्लक्ष
- अमरावती ते नागपूरदरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर काही ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत.
- रस्त्याचा काही भाग खूप खराब झालेला आहे. अनेक ठिकाणी खड्डे, तुटलेले कठडे, खराब पृष्ठभाग ही नित्याचीच बाब झाली आहे. रात्री दिवे नसणे, उणीव असलेली चिन्हे, दिशा बोर्ड, बॅरिकेड्स नीट न लावलेले, वाहतूक नियंत्रण योग्यप्रकारे न होणे.