दीड लाखांची सुपारी... आणि एका लिपिकाचा रक्तरंजित मृत्यू !
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 16:37 IST2025-08-25T16:25:59+5:302025-08-25T16:37:33+5:30
आर्थिक व्यवहारातून हत्येचा संशय : तीन विधिसंघर्षित बालके ताब्यात, क्राईमची कारवाई

Murder worth 1.5 lakh... and the bloody death of a clerk!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील एका शाळेत कार्यरत वरिष्ठ लिपिकाच्या हत्येचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणाच्या मास्टरमाइंड असलेल्या फरार आरोपीने सुमारे दीड लाख रुपयांमध्ये त्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती चौकशीअंती पुढे आली आहे. २२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ च्या सुमारास बडनेरा रेल्वेस्थानक ते तिलकनगर मार्गावर रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्तबंबाळ स्थितीत आढळला होता. अतुल ज्ञानदेव पुरी (वय ५०, रा. पुंडलिकबाबा नगर) अशी मृताची ओळख पटविण्यात आली होती. या हत्येला आर्थिक व्यावहारिक वादाची किनार असण्याची दाट शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मात्र अद्यापही मास्टरमाइंड हाती आला नसल्याने खुनाचे कारण स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या हत्या प्रकरणात दोन युवकांना अटक केली. तर, तीन विधिसंघर्ष बालकांनाही चौकशीकरिता ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली. साहिल ऊर्फ गोलू हरी मोहड (१९, रा. आदिवासी कॉलनी), सक्षम विजय लांडे (१९, रा. सावंगा गुरव, नांदगावखंडेश्वर, ह. मु. व्यंकय्यापुरा, अमरावती), अशी अटक दोघांची नावे आहेत. खून करताना या दोघांसोबत एक विधिसंघर्षित बालकही होता. अतुल पुरी यांचा खून केल्यानंतर त्यांना पळून जाण्यासाठी अन्य दोन विधिसंघर्ष बालकांनी मदत केली. त्यामुळे एकूण तीन विधिसंघर्ष बालकांना आतापर्यंत चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. आर्थिक व्यवहारातून अतुल पुरी यांच्या हत्येसाठी सुपारी देण्यात आली. सुपारी देणाऱ्या मास्टरमाइंडचा चेहरा उलगडला असला तरी त्याच्या अटकेनंतर हत्येचे कारण स्पष्ट होईल, असे शिंदे म्हणाले.
मास्टरमाईंडच्या शोधार्थ पथके रवाना
अतुल पुरी यांच्याविरूद्ध गतवर्षी फ्रेजरपुरा पोलिसांत गंभीर गुन्हा दाखल होता. त्यात त्यांना अटक देखील झाली होती. ती घटनादेखील आर्थिक व्यवहारातून घडली होती. त्यामुळे पुरी यांचा खून सुपारी देऊन करवून घेतल्याचे उघड झाले असले तरी कारण मात्र स्पष्ट झाले नाही. त्यामुळे पोलिसांनी जुन्या प्रकरणाचे धागेदोरे जुळविण्याकडे लक्ष वळविले आहे.
कारंजा लाडला पळाले
२२ ऑगस्ट रोजी सकाळी अतुल पुरी हे बडनेरा रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने जात होते. त्यावेळी दुचाकीवर असलेल्या तिघांनी पाठलाग करून अडवून त्यांची हत्या केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले होते. ते तिघेही मारेकरी वर्धा जिल्ह्यातील कारंजा येथे निघून गेले होते. त्यांना गुन्हे शाखेने कारंजालाड येथून अटक करून बडनेरा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षकत्रयी अमोल कडू, महेश इंगोले व अनिकेत कासार यांच्या पथकाने ही कारवाई केली.