महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटींचा !
By Admin | Updated: March 19, 2016 00:04 IST2016-03-19T00:04:02+5:302016-03-19T00:04:02+5:30
मर्यादित स्त्रोतांवर आधारित महापलिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सुमारे ८०० कोटी रुपयांचा असण्याचे संकेत आहेत.

महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटींचा !
वस्तुनिष्ठतेवर भर : शिलकीचे अंदाजपत्रक सादर होण्याचे संकेत
अमरावती : मर्यादित स्त्रोतांवर आधारित महापलिकेचा यंदाचा अर्थसंकल्प सुमारे ८०० कोटी रुपयांचा असण्याचे संकेत आहेत. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडताना शिलकीचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता अधिक आहे.
नवनियुक्त स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर मार्चच्या अखेरीस अर्थसंकल्प मांडतील. तत्पूर्वी आयुक्तांनी अर्थसंकल्पावर मोहोर उमटविली. पुढील आठवड्यात वार्षिक अंदाजपत्रक स्थायी समितीसमोर सादर होईल. स्थायी समितीच्या अवलोकनानंतर आमसभेत अर्थसंकल्प मांडण्यात येईल. वर्षअखेरीस किंवा सन २०१७ च्या पूर्वार्धात महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊ घातल्याने या पंचवार्षिकमधील शेवटच्या अर्थसंकल्पाला महत्त्व प्राप्त झाले आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता अर्थसंकल्प फुगवून सादर करण्यात आल्याचे दिसते. मात्र, यंदा वस्तुनिष्ठ आणि खर्चाचा योग्य ताळमेळ बसविणारा अर्थसंकल्प मांडणार असल्याची ग्वाही मार्डीकर यांनी दिल्याने महापालिका वर्तुळासह नागरिक, व्यवसायिकांमध्ये औत्सुक्याचे वातावरण आहे. आयुक्तपदी रूजू झाल्यानंतर चंद्रकांत गुडेवार यांचा देखील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. मागील वर्षी सुमारे ६३५ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. यंदा त्यात सुमारे १५० कोटींची वाढ अपेक्षित आहे. भांडवली आणि महसूलमधून प्रत्येकी ५० टक्के खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)
इमारतींवरील कर हा मुख्य स्त्रोत
एलबीटी बंद झाल्याच्या पार्श्वभूमिवर शासनाकडून आलेले तफावतीचे सुमारे १०० कोटी व इमारती करातून प्राप्त ३५ कोटी हे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत. याशिवाय पथकर, अग्निकर, जाहिरात कराच्या माध्यमातून महापालिकेकडे महसूूल जमा होतो. यंदा पथकरात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे.
परिवहनसेवेतून अधिक रक्कम
शहर बससेवेसाठी पृथ्वी ट्रॅव्हल्ससोबत नव्याने ५.२२ प्रतिकिलोमीटर दराने करार केल्याने पालिकेला गेल्या ५ वर्षांच्या तुलनेत अधिक रॉयल्टी मिळणार आहे. नव्या आर्थिक वर्षात परिवहन सेवेतून पालिकेला सुमारे दीड कोटी रूपये अपेक्षित आहेत.
‘अमृत’मुळे भांडवली उत्पन्नात भर
अमृत योजनेमध्ये महापालिकेला ८५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याने यंदा भांडवली उत्पन्नात भर पडली आहे. याशिवाय घरकुलासाठी १७५ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. ही बाब प्रशासनासाठी सुखावह आहे.
मर्यादित उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ योग्यरीत्या बसवून वस्तुनिष्ठतेकडे जाणारा अर्थसंकल्प मांडण्याचे प्रयत्न आहेत. जनतेवर बोझा न लादता उत्पन्नाच्या नवीन स्त्रोतावर लक्ष ठेवून सर्वसमावेशक अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.
-अविनाश मार्डीकर, सभापती, स्थायी समिती