The multi-billion dollar hive market canceled | कोट्यवधींची उलाढाल करणारा पोळा बाजार रद्द

कोट्यवधींची उलाढाल करणारा पोळा बाजार रद्द

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट : व्यावसायिक अडचणीत, शेंदूरजनाघाट सुनेसुने

लोकमत न्यूज नेटवर्क
शेंदूरजनाघाट : येथील पोळ्याच्या बाजारावर यंदा कोरोनाचे संकट कोसळले आहे. त्यामुळे कारागिरांना साहित्य विक्री व ग्राहकांना खरेदीचे समाधान देणारा शेंंदूरजना येथील हा बाजार यंदा होणार नाही.
पंचक्रोशीत शेंदूरजना घाट येथील पोळा बाजार प्रसिद्ध आहे. या पोळा बाजारात अवघ्या ३६ तासांत कोट्यवधींची उलाढाल होते. फर्निचरपासून गृहपयोगी, शेतीविषयक वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. सर्वांत मोठी उलाढाल ही फर्निचर बजारात होत असते. सोफा, दिवाण, कपाट, टेबल, खुर्च्या या लाकडी तसेच फायबर वस्तूंची रेलचेल असते. कुऱ्हाड, विळा, डवरे, वखराची पास, खुरपी, सब्बल आदी वस्तू शेतकरी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. तव्यापासून सर्वच गृहपयोगी वस्तू या बाजारात सहज उपलब्ध होतात. लहान मुलांच्या खेळण्यापासून तरुणींच्या सौंदर्य प्रसाधनापर्यंत सर्व गोष्टी सहज मिळतात.
पोळ्याच्या आदल्या दिवशी लागणाऱ्या दुकानांमधून २४ तास एकच गर्दी असते. रात्री २ पर्यंत हा बाजार सुरू असतो. या बाजारासाठी अमरावती, नागपूर, वर्धा तसेच मध्य प्रदेशातून दुकानदार माल विक्रीस आणतो. ते या बाजाराची वाट बघतात. बाजारात विक्रीस येणाºया मालाची निर्मिती बरेच दिवसांपूर्वी सुरू होते. पोळा बाजारातून माल खरेदी करण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक गर्दी करतात. यावर्षी संत्र कलमांना चांगला भाव मिळाल्याने खरेदी वाढली असती. परंतु, कोरोनाचे संकट या बाजारावरही कोसळले.

नगरपालिकेने काढली नोटीस
शेंदूरजनाघाट येथे ३१ जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. त्यामुळे नगर परिषदेने यावर्षी पोळा बाजार भरणार नसल्याचे नोटीस काढली आहे. याशिवाय जमावबंदीचा आदेश काढला असून, पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एका ठिकाणी एकत्र येऊ नये, असे बजावले आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता, नागरिकांनी सहकार्य करून सुरक्षित राहावे, असे आवाहन करण्यात आले. वर्षानुवर्षाची परंपरा असलेला पोळा बाजार यावर्षी भरणार नसल्याने कारागिरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. बाजारातून विशेष खरेदी करण्याची संधी यावर्षी ग्राहकांना मिळणार नाही.

Web Title: The multi-billion dollar hive market canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.