अमरावती : वर्षभरात महावितरणने केवळ अखंडित सेवा दिली. काळ वाईट होता याची जाण होती म्हणूनच महावितरणकडून वीजबिल भरण्याचा कोणताच तगादा लावला नाही, परिणामी या काळात वाढलेल्या थकबाकीने महावितरणसमोर थेट अस्तित्वाचेच संकट निर्माण झाले आहे. थकीत वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी केले. अमरावती परिमंडळात ग्राहकांवर २९३ कोटींची थकबाकी असल्याचे त्यांनी सांगितले.
अमरावती परिमंडळात गेल्या वर्षभरात घरगुती,वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारितीलच ५ लक्ष ४० हजार ग्राहकांकडे २९३ कोटी ६५ लक्ष रूपयाची वीज बिलाची थकबाकी आहे. परिमंडळा तील १ लक्ष ७९ हजार ग्राहकांनी एप्रिल २०२० नंतर एकदाही वीजबिल न भरल्याने त्यांच्याकडे वीजबिलाचे १४५ कोटी ५४ लक्ष रुपये थकले आहे. त्यामुळे महावितरणचा कारभार चालवायचा कसा, असा प्रश्न करीत महावितरण अडचणीत असल्याचे गुजर म्हणाल्या.