मायलेकीचा आत्मघात; कर्ता कारागृहात अन् कुटुंब उद्ध्वस्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2022 10:48 AM2022-10-28T10:48:02+5:302022-10-28T10:50:59+5:30

शिक्षक सन्मती कॉलनीतील ह्रदयद्रावक घटना; सीडीआर तपासणार

Mother and daughter commits suicide on diwali day, headmaster husband arrested and family destroyed | मायलेकीचा आत्मघात; कर्ता कारागृहात अन् कुटुंब उद्ध्वस्त!

मायलेकीचा आत्मघात; कर्ता कारागृहात अन् कुटुंब उद्ध्वस्त!

googlenewsNext

अमरावती : सुवर्णा व मृणाल या माय लेकींनी गळफास घेऊन आत्मघात केला. त्यांना आत्मघातास प्रवृत्त केल्याप्रकरणी कर्ता पुरुष कारागृहात गेला अन् क्षणात एक हसरे त्रिकोणी कुटुंब उद्ध्वस्त झाले. प्रदीप वानखडे याला गुरुवारी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे तो कारागृहात गेला. शिक्षक सन्मती कॉलनीतील वानखडे यांचे घर त्यांचा जामीन होईपर्यंत कुलूपबंद झाले.

दिवाळीच्या दिवशी सायंकाळनंतर सुवर्णा व मृणाल या माय-लेकीनी गळफास घेतला. मंगळवारी रात्री ही घटना उघड झाली. मृणालची सुसाईड नोट व सुवर्णा यांच्या भावाच्या तक्रारीवरून प्रदीप वानखडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शेगावहून परतताच त्याला अटक करण्यात आली. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी दुपारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात केली.

‘बाबाला आम्ही नको आहे; आता बस झाला त्रास’

दुसरीकडे पोलिसांना माय-लेकीचा प्राथमिक, शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला असून, दोघींचा मृत्यू श्वासावरोधामुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, दोघींनी नेमकी केव्हा आत्महत्या केली, ती घटनावेळ डॉक्टरांनी नमूद केली नाही. घटनेच्या निश्चित वेळेबाबत गाडगेनगर पोलिसांनी डॉक्टरांना विचारणा केली आहे. दोघींच्या आत्महत्येची अचूक वेळ कळल्यास अनेक अनाकलनीय बाबींचा उलगडा शक्य आहे.

या दिशेने केला जात आहे तपास

प्रदीप वानखडे याच्या जबाबानुसार, तो दिवाळीच्या दिवशी २४ ऑक्टोबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास घराबाहेर पडून शेगावला पोहोचला. त्याने शेगावमध्ये ज्या लॉजमध्ये मुक्काम केला, तेथील पावतीदेखील पोलिसांना दाखविली आहे. कौटुंबिक वाद असल्याची कबुली त्याने दिली. मात्र, कन्या व पत्नीच्या आत्महत्येबाबत आपल्याला काहीच माहिती नसल्याचा दावा त्याने केला आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यापासून घटनेपर्यंत त्याने पत्नी व मुलीशी संवाद साधला का, यासाठी तिघांच्याही मोबाईलचा सीडीआर मागविला जाणार आहे.

अचानक का, कशासाठी, केव्हा?

प्रदीप हा घरी असताना त्याचा पत्नी वा मुलीशी वाद झाला की कसे, स्वयंपाक पूजनाची तयारी झाली असताना मायलेकी अचानक आत्महत्येचा निर्णय घेतात. क्षणात सारे काही 'जैसे थे' ठेवून त्या फासावर झुलतात, इतका टोकाचा निर्णय त्या का घेतात, कशासाठी व केव्हा, या अनेक प्रश्नांची उत्तरे गाडगेनगर पोलीस शोधत आहेत. दोघींनी एकाचवेळी गळफास घेतला की दोघींपैकी कुणी एकाने गळफास लावला, ते पाहून दुसरी भेदरली, आता आपल्या जगणे निरर्थक, असा विचार झाला की कसे, या बाजू देखील अभ्यासल्या जाणार आहेत.

Web Title: Mother and daughter commits suicide on diwali day, headmaster husband arrested and family destroyed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.