अमरावती : जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरातील १९८१ गावांपैकी १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील सर्वाधिक १८४ गावांचा तर सर्वात कमी टंचाईची ९० गावे चांदूर रेल्वे तालुक्यातील आहेत.जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जिल्ह्यातील एकूण १९८१ महसुली गावांत टंचाई जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या २५ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासननिर्णयानुसार सन २०१४-२०१५ यावर्षातील खरीप हंगामातील ज्या गावांची नावे टंचाई म्हणून जाहीर केली आहे त्या गावांमध्ये ५० पैशाच्या आत आणेवारी असल्यामुळे टंचाईची घोषणा करून या गावामध्ये दुष्काळी स्थितीत आवश्यक उपायोजनासुध्दा जाहीर केल्या आहेत. टंचाईग्रस्त तालुकानिहाय गावांच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक टंचाईची गावे अचलपूर तालुक्यात १८४ तर सर्वात कमी गावे ९० चांदूररेल्वे तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ चांदूरबाजार तालुक्यातील १७१, चिखलदरा तालुक्यातील १६३, नांदगाव खंडेश्र्वर तालुक्यातील १६१, मोर्शी १५६, धारणी १५२, दर्यापूर १५०, अमरावती १४३, वरूड १४०, भातकुली १३७,अंजनगाव सुर्जी १२७, धामणगाव रेल्वे ११२, तिवसा ९५ व चांदूररेल्वेत ९० अशा सुमारे १९८६ गावांमध्ये टंचाई जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेली ही गावे क्रमवारीनुसार पाहिल्यास गावांची संख्यानिहाय क्रम असा लागतो. विशेष म्हणजे अमरावती तालुक्यातील तुळजापूर, गावातील जमिन औद्योगिक वसाहतीत गेली आहे. चांदूररेल्वे तालुक्यातील सावंगा येथील शेती शंभर टक्के बुडीत क्षेत्रात गेली आहे. वरूडमधील चांदूरवाडी आणि धारणी तालुक्यातील दुधाणी आदी गावात महसुल विभागाची जमिन नसल्याने ही चार गावे टंचाईमधून वगळण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)
अचलपुरात सर्वाधिक दुष्काळग्रस्त गावे
By admin | Updated: December 6, 2014 22:38 IST