बहिरममध्ये माकडांची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST2020-08-17T05:00:00+5:302020-08-17T05:01:27+5:30
बहिरम मंदिरावर शंभर दीडशे, अडना घाटात शंभर दीडशे तर बहिरम यात्रा परिसरात ७० ते ८० लालतोंडे माकडे डेरेदाखल आहेत. या लालतोंड्या माकडांपासून सर्वजण त्रस्त झाले आहेत. माणसांनाच नव्हे तर काळतोंड्या माकडांनाही ही लालतोंडी माकडं नकोशी झाली आहेत. अरे म्हटले, हात उगारला किंवा काठी दाखवली की, ही लालतोंडी माकडे त्याचा पिच्छाच पुरवतात.

बहिरममध्ये माकडांची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : श्री सिद्ध क्षेत्र बहिरममध्ये एक महिन्यांपासून लालतोंड्या माकडांनी दहशत पसरवली आहे. बहिरम -बैतूल मार्गावरील अडना घाटातही त्यांनी डेरा जमविला आहे.
ही लालतोंडी माकडे आक्रमक प्रवृत्तीचे असून त्यांनी आतापर्यंत अनेकांना चावा घेतला आहे. येणाऱ्या जाणाऱ्याला धड उभेही ते राहून देत नाहीत. माणसांच्या अंगावर ते धावून जात आहेत. त्यांच्या हातातील पिशवी, वस्तू, सामान, साहित्यही ते पळवून नेत आहेत.
यापूर्वी बहिरम किंवा अडना घाटात ती लालतोंडी माकडे नव्हती. काळ्या तोंडाची माकडे तेवढी वास्तव्याला होती. आज मात्र या काळ्या तोंडाच्या माकडांना या लालतोंड्या माकडांनी बहिरम मंदिर परिसरातून, अडना घाटातून हाकलून लावले आहे.
काळ्या तोंंडाच्या माकडांवर हे लालतोंंडी माकडे तुटून पडतात. त्यांच्याशी झुंजतात. काळ्या तोंडाचे माकड दिसले की वेगवेगळ्या प्रकारचा आवाज काढून लालतोंडे आपल्या सवंगड्यांना बोलावून एकत्रितपणे लढतात.
बहिरम मंदिरावर शंभर दीडशे, अडना घाटात शंभर दीडशे तर बहिरम यात्रा परिसरात ७० ते ८० लालतोंडे माकडे डेरेदाखल आहेत. या लालतोंड्या माकडांपासून सर्वजण त्रस्त झाले आहेत. माणसांनाच नव्हे तर काळतोंड्या माकडांनाही ही लालतोंडी माकडं नकोशी झाली आहेत. अरे म्हटले, हात उगारला किंवा काठी दाखवली की, ही लालतोंडी माकडे त्याचा पिच्छाच पुरवतात. ती व्यक्ती जोपर्यंत त्यांच्या नजरेआड होत नाही तोपर्यंत ते शांत बसत नाहीत. सुतळी बॉम्ब फोडला की कार्बाईडच्या बंदुकीतून आवाज करा, ही माकडे त्याकडे साधे लक्षही देत नाहीत.
वनविभागाने बंदोबस्त करावा
शेकडोच्या संख्येत बहिरममध्ये दाखल झालेल्या लालतोंडे माकडांना वन विभागाने पकडून जंगलात सोडावे. त्या माकडांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी यात्रेकरुंसह गावकऱ्यांनी केली आहे. बहिरम तीर्थस्थळी ये-जा करणारे पर्यटक आणि बहिरम-बैतूल मार्गावरील अडना घाटातून दुचाकीने प्रवास करणाऱ्यांनी या माकडांपासून सावधानता बाळगण्याच्या सूचना बहिरम मंदिर ट्रस्टच्यावतीने ट्रस्टींनी केल्या आहेत.
वनविभागावर आरोप
बहिरममध्ये यापूर्वी कधीही लालतोंडी माकडे नव्हती. वनविभागाने ती बहिरमात आणून सोडल्याचा आरोप गावकºयांसह यात्रेकरुंनी केला. मात्र ती माकडे मध्यप्रदेशातील असल्याचे येथील वनविभागाचे म्हणणे आहे.