घरात शिरून महिलेचा विनयभंग, नातेवाईकाला संपविण्याची गर्भित धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: June 21, 2023 13:14 IST2023-06-21T13:13:50+5:302023-06-21T13:14:11+5:30

सोन्याचे दागिणे नेले हिसकावून

Molesting a woman by entering the house, threatening to kill a relative | घरात शिरून महिलेचा विनयभंग, नातेवाईकाला संपविण्याची गर्भित धमकी

घरात शिरून महिलेचा विनयभंग, नातेवाईकाला संपविण्याची गर्भित धमकी

अमरावती : ‘थांब, तुझ्या नातेवाईकाची गर्दन उडवतो!’ अशी गर्भित धमकी देत एका महिलेचा विनयभंग करण्यात आला. तथा तिच्या गळ्यातील सोन्याची पोत व डोरले तो हिसकावून निघून गेला. बडनेरा ठाण्याच्या हद्दीत २० जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दुपारी आरोपी ललित मेहरे (रा. अमरावती) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, आरोपी ललित हा फिर्यादी महिलेच्या नातेवाईकाचा मुलगा आहे. आरोपी हा त्याच्या नातेवाईकाला नेहमीच मारझोड करतो. म्हणून ती महिला नातेवाईक ही फिर्यादी महिलेच्या घरी झोपण्याकरिता येते. १ जून रोजी आरोपीने फिर्यादी महिलेच्या नातेवाईकाला मारहाण केली. फिर्यादी व तिच्या नातेवाईक महिलेने आरोपीस हटकले असता त्याने दोघींसोबत भांडण केले होते. त्यामुळे फिर्यादी महिलेने आरोपीविरूध्द पोलीस ठाण्यात रिपोर्ट दिला होता. दरम्यान, २० जून रोजी फिर्यादी ही घरात काम करीत असतांना आरोपी हा किचनच्या दरवाजातून आत आला व तिची गच्ची पकडली. तिचा विनयभंग केला. तसेच तुझ्या नातेवाईकाची गर्दन उडवून लटकवितो अशी धमकी तिला दिली.

भेदरली अन् सावरली देखील

आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने महिलेच्या गळ्यातील ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत व सोन्याचे डोरले असे एकुण ३० हजार रुपयांचे दागिने जबरदस्तीने तोडले. ते दागिणे तो स्वतः च्या खिशात टाकून निघुन गेला. अचानक घडलेल्या त्या घटनेने ती महिला प्रचंड भेदरली. मात्र, स्वत:ला सावरत तिने लगेचच बडनेरा पोलीस ठाणे गाठले. तेथे ठाणेदार नितीन मगर यांच्या निर्देशानुसार महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिचे बयाण नोंदवून घेतले.

Web Title: Molesting a woman by entering the house, threatening to kill a relative