अमरावतीत आॅगस्ट महिन्यात मिसाईल कारखाना
By Admin | Updated: April 25, 2015 00:13 IST2015-04-25T00:13:58+5:302015-04-25T00:13:58+5:30
अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी शुक्रवारी नवे पाऊल राजधानीत दिल्लीत पडले.

अमरावतीत आॅगस्ट महिन्यात मिसाईल कारखाना
तीन महिन्यांत कंपनीची नियुक्ती : स्थानिकांना मिळणार रोजगार
अमरावती : अमरावतीच्या औद्योगिक विकासासाठी शुक्रवारी नवे पाऊल राजधानीत दिल्लीत पडले. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रिय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला संरक्षण मंत्र्यांनी अमरावतीत मिसाईल निर्मिती कारखानाची मुहूर्तमेढ व प्रत्यक्ष कामाला सुरुवात आॅगस्ट महिन्यात होईल, असे स्पष्ट सांगितले.
तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्वरित क्षेपणास्त्र निर्मिती करणाऱ्या कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे .
संरक्षण विषयक कारखाना असल्यामुळे या प्रकल्पांसाठी कौशल्याधारित मनुष्यबळाची आवश्यकता राहणार आहे. त्यामुळे कौशल्य विकासाची कामे तातडीने सुरु करा, जेणेकरून प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु होत असताना आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार राहील, अशी सूचना संरक्षणमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केली.
क्षेपणास्त्रांची
होणार निर्मिती
साधारणपणे सात किमी अंतरावर मारा करू शकतील, अशी निर्मिती क्षमता असलेले क्षेपणास्त्रांची या कारखान्यात तयार केली जातील. या प्रकल्पामुळे औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्याचा कायापालट होणार आहे. काही वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला प्रकल्प मार्गी लागत आहे.