लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, राणीगाव घाटात अपघात; एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2022 22:25 IST2022-05-09T22:25:16+5:302022-05-09T22:25:55+5:30
Amravati News मेळघाटातील राणीगाव येथून मध्य प्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक राणीगाव घाटात उलटला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आठ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक उलटला, राणीगाव घाटात अपघात; एकाचा मृत्यू
अमरावती: मेळघाटातील राणीगाव येथून मध्य प्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारा मिनीट्रक राणीगाव घाटात उलटला. यात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर आठ गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. सुदैवाने नवरदेव व नवरी दुसऱ्या वाहनात गेल्याने ते अपघातापासून वाचले. सोमवारी सायंकाळी ६ वाजता ही घटना घडली.
दगडिया जामसिंग भिलाला (वय ६०, रा. पंचतलाई, गुडी, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे. वाहनामध्ये बसलेले अनिल कालू बडोले (२८), मुकेश गणेश बडोले (३०), गणेश प्रताप निगम (१६), कलाबाई दगड्या बडोले (६०), अर्जुन बहादूर भटनागर (७), मंजू सदिया उडबे (१२), संजय सुकलाल सोलंके (३०) आदी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
धारणी मुख्यालयापासून ५० किमी अंतरावर असलेल्या राणीगाव येथून सोमवारी सायंकाळी ६ वाजता मिनीट्रक (सीजी १५ एसी ०११६) हे वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने जात होते. घाटात जाताना वाहन अपघात होऊन रस्त्यावर उलटल्याने एकाचा मृत्यू झाला. जखमींना उपचारासाठी नजीकच्या आरोग्य केंद्र तसेच धारणी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. अपघात होताच नजीकच्या गावातील आदिवासी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींची मदत केली.
नवरदेव, नवरी बचावले
मध्यप्रदेशातून आलेले वऱ्हाडी राणीगाव येथे लग्न आटोपून सायंकाळी परत जात असताना हा अपघात झाला. परंतु, नवरदेव-नवरी दुसऱ्या वाहनात गेल्याने ते वाचले.