विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 05:00 AM2021-03-12T05:00:00+5:302021-03-12T05:00:57+5:30

एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतनसमाेर उमेदवार एकत्र आले. संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार तंत्रनिकेतन ते पंचवटी चौक दरम्यान विद्यार्थी पायी चालत गेले. पंचवटी चौकात चक्काजाम आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 

Mild police beatings on student agitation | विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

विद्यार्थी आंदोलनावर पोलिसांचा सौम्य लाठीमार

Next
ठळक मुद्दे२३ विद्यार्थी डिटेन करून सोडले, पंचवटी चौकात तासभर आंदोलन, राज्य राखीव दलाची तुकडीही तैनात

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राज्य शासनाने कोरोना संसर्गामुळे १४ मार्च रोजी होऊ घातलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त करीत गुरुवारी दुपारी ४ वाजता येथील पंचवटी चौकात विद्यार्थ्यांनी रस्त्यावर आंदोलन पुकारले. यामुळे काही वेळ वाहतूक ठप्प झाली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलनाला उग्र स्वरुप देण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. तेथे दाखल झालेले माजी मंत्री अनिल बोंडे यांच्यासह २३ विद्यार्थ्यांना डिटेन करून सोडण्यात आले.
एमपीएससीच्या परीक्षा पुन्हा ढकलण्यात आल्याच्या निषेधार्थ येथील शासकीय तंत्रनिकेतनसमाेर उमेदवार एकत्र आले. संवैधानिक मार्गाने चक्काजाम करण्याचा आंदोलक विद्यार्थांनी निर्णय घेतला. त्यानुसार तंत्रनिकेतन ते पंचवटी चौक दरम्यान विद्यार्थी पायी चालत गेले. पंचवटी चौकात चक्काजाम आंदोलन केल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. 
पोलीस घटनास्थळी पाेहोचले आणि विद्यार्थ्यांना रस्त्याच्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी पोलिसांच्या कृतीचा केला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज सुरू करताच धावपळ सुरू झाली. यात आघाडीवर असलेल्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यात १९ मुले, तर चार मुलींना डिटेन करून सोडण्यात आले. तासभर चाललेल्या आंदोलनासाठी गाडगेनगर पोलीस, एसआरपीएफ, क्यूआरटी पथक तैनात होते.  
आंदोलनानंतर महापौर चेतन गावंडे, भाजपचे शिवराय कुळकर्णी, निवेदिता चौधरी, किरण पातूरकर, प्रणीत सोनी, बादल कुळकर्णी, धीरज बारबुद्धे आदींनी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली. 

पालकमंत्र्यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश, विद्यार्थ्यांना विनाशर्त साेडा
एमपीएससी परीक्षा लांबणीवर टाकल्याप्रकरणी आंदोलन करणाऱ्या २३ विद्यार्थ्यांना गुरुवारी पोलिसांनी ‘डिटेन’ केले. त्यानंतर पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला. विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नका. त्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा विचार व्हावा. मीसुद्धा आंदोलनातून राजकारणात आले आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर पुढे शिक्षणावर विपरीत परिणाम होतो, असे पालकमंत्री म्हणाल्या. सामाजिक जाणिवेतून विद्यार्थ्यांचा विचार करावा,  त्यांना विनाशर्त सोडावे, असे निर्देश पालकमंत्री ठाकूर यांनी पोलीस आयुक्तांना दिले. त्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई न करता आंदोलक विद्यार्थ्यांना सोडले, हे विशेष.

अनिल बोंडे म्हणाले, 
‘चोरमले, तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’

आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस व्हॅनमधून बाहेर काढण्यासाठी सरसावलेले माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांना एका पोलीस उपनिरीक्षकांनी मज्जाव केला. विद्यार्थी हे  स्वत:च्या हक्कासाठी लढा देत आहेत, असे बोंडे म्हणाले. मात्र, कोरोनाकाळात आंदोलन करता येत नाही, सरकारकडे मागणी करा, असे ठाणेदार चोरमले म्हणाले. संयमाने बोला, संयम शिकवू नका, असे बोंडे यांनी प्रत्युत्तर दिले. मुलींना पोलीस व्हॅनमधून कोंबून नेता. महिला पोलीस सोबत नाही, त्या काही चोर नाहीत, असा मुद्दा बोंडे यांनी उपस्थित केला. चोरमले तुम्हाला नोकरी मिळाली म्हणून झाले का, असेही ते म्हणाले. आंदोलकांना संधी दिली आहे, असे चोरमले म्हणाले.  तेव्हा बोंडे यांनी उसळून ‘चोरमले, तुम्ही सरकारचे कुत्रे झाले’ असे दोन वेळा म्हणाले. यावेळी बोंडे व चोरमले यांच्यातील वातावरण तापले. बोंडे यांनाच ताब्यात घेण्याच्या सूचना चोरमले यांनी दिल्या. पोलीस वाहनात त्यांना आयुक्तालयात नेण्यात आले. 

एमपीएसीच्या परीक्षा नियोजित वेळेतच व्हाव्यात, हीच मागणी आहे. पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. मुलींना पांगविण्यासाठी काठ्या फेकून मारल्या. पोलीस व्हॅनमधून आरोपींसारखे नेण्यात आले. ही बाब अन्यायकारक आहे.
- अक्षय नरगळे 
आंदोलक विद्यार्थी.

भाजप सरकारच्या काळापासून एमपीएससी परीक्षा लांबणीवर जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकारकडून बेरोजगार तरुणांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.  परीक्षा वेळेवर व्हाव्यात, अशी युवक काँँग्रेसची भूमिका आहे.
- सागर देशमुख 
प्रदेश सरचिटणीस युवक काँग्रेस

 

Web Title: Mild police beatings on student agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस