अमरावतीत १.२५ लाखांचा एमडी जप्त! सीआययुची ८ फेब्रुवारीनंतर पहिली कारवाई
By प्रदीप भाकरे | Updated: June 3, 2025 15:33 IST2025-06-03T15:33:06+5:302025-06-03T15:33:51+5:30
फ्रेजरपुरा हद्दीत एमडीसह इसम पकडला : पॅन्टच्या खिशातून मिळाली १.२५ लाखांची नशा

MD worth 1.25 lakh seized in Amravati! CIU's first action after February 8
अमरावती: पोलीस आयुक्तांच्या सीआययु पथकाने फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून २५ ग्रॅम एमडी जप्त केले. दोन जून रोजी रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
उमेश महादेवराव मेश्राम (वय ४९ वर्ष रा. मिलचाळ, नवी वस्ती, बडनेरा अमरावती) अशी अटक आरोपीचे नाव आहे. एक इसम एम.एच. २७ डी.एम. ३९९६ या दुचाकीने दस्तुरनगरकडुन बियानी चौक मार्गे अमरावती येथे एमडी विक्री करण्याकरीता येत असल्याची माहिती सीआययु पथकाला मिळाली होती. त्या आधारे त्याची झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात १.२५ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन आढळून आले. त्याच्याकडून त्या एमडी पावडरसह दुचाकी व मोबाईल असा एकूण २.२० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
त्याचेविरुद्ध फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेतील क्रिमिनल इंन्टेलिजन्स युनिटमधील सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या पथकाने केली. विशेष म्हणजे ८ फेब्रुवारी २०२५ नंतर सीआययूची ही पहिलीच कारवाई ठरली आहे. ८ फेब्रुवारी रोजी या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील एका शॉपमध्ये धाड टाकून इ सिगारेट जप्त केल्या होत्या.