अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलात भीषण आग; वन्यजीव बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 15:10 IST2021-02-12T15:08:34+5:302021-02-12T15:10:16+5:30
Amravati News वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील पोहरा बीट वनखंड क्रमांक ४० मध्ये बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली.

अमरावती जिल्ह्यातील पोहरा जंगलात भीषण आग; वन्यजीव बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोहरा वर्तुळातील पोहरा बीट वनखंड क्रमांक ४० मध्ये बुधवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत सुमारे १० हेक्टर जंगल जळून खाक झाले. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण केले होते. जोराचा वारा असल्याने ही आग पसरत गेल्याने पोहरा जंगातील १० हेक्टर वनक्षेत्र आगीने भक्ष्य केले.
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी दोन ते तीन बोलेरो मशीनचा वापर करण्यात आला. या आगीत जंगलातील गवत पूर्णपणे खाक झाले असून, मोठ्या वृक्षांनाही आगीचा फटका बसला आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा बीट वनरक्षक डी.ओ.चव्हाण, संरक्षण मजूर योगेश राठोड, सुमेरसिंग जाधव, रशिद पठाण यांच्या अथक प्रयत्नानंतर २ वाजताच्या सुमारास ही आग नियंत्रित करण्यात यश आले. वडाळी वनपरिक्षेत्रात उन्हाळ्यापूर्वीच हिवाळ्यात आगीच्या मालिका सातत्याने सुरूच आहे. ही आग अमरावती-चांदूर रेल्वे महामार्गाच्या बोडणा मार्गावर पोहोचली होती. या आगीत कोणत्याही वन्यजीवाचे नुकसान झाले नाही. जंगलात आग लागल्याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध वनगुन्हा जारी करण्यात आला आहे.
आग नियंत्रणासाठी आधुनिक व पारंपरिक पद्धतीचा वापर
आग नियंत्रणात आणण्यासाठी दोन ते तीन बोलेरो मशीन व पारंपरिक पद्धतीने पळसाच्या मोठ्या फांद्याच्या वापर करण्यात आला. सोसाट्याचा वारा असल्याने पोहरा जंगलात आगीने रौद्ररुप धारण केले होते. जंगल वेगाने जळत असताना, वन्यप्राण्यांनी झपाट्याने स्थान बदलविले.