नागपुरी संत्र्याला मिळाली हक्काची बाजारपेठ !
By Admin | Updated: October 26, 2015 00:33 IST2015-10-26T00:33:03+5:302015-10-26T00:33:03+5:30
एकीकडे शेतकरी आत्महत्या आणि त्यावरील उपाययोजनांचा ऊहापोह सुरू असताना संत्रा उत्पादकांनी नैसर्गिक संकटावर मात करीत जिल्ह्याबाहेर हक्काची बाजारपेठ मिळविली आहे.

नागपुरी संत्र्याला मिळाली हक्काची बाजारपेठ !
देशातील १० शहरांमध्ये थेट विक्री : शेतकऱ्यांना होतोय नफा
अमरावती : एकीकडे शेतकरी आत्महत्या आणि त्यावरील उपाययोजनांचा ऊहापोह सुरू असताना संत्रा उत्पादकांनी नैसर्गिक संकटावर मात करीत जिल्ह्याबाहेर हक्काची बाजारपेठ मिळविली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार, अचलपूर, अकोट आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील अनेक संत्रा उत्पादकांच्या बागांमधील संत्रा थेट विशाखापट्टणम्, भोपाळ, इंदोरला नेऊन थेट विक्री करीत आहेत. मागील १० दिवसांत अमरावती जिल्ह्यातून सुमारे ५० टन संत्रा हैदराबाद, भोपाळ, इंदूर, कोल्हापूर येथे नेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन् मंडळ, कृषी समृध्दी प्रकल्प आणि ‘महाआॅरेंज’तर्फे विदर्भातील शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनाला योग्य भाव मिळण्याच्या दृष्टीने उत्पादक ते थेट ग्राहक ही संकल्पना राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ‘केम’ च्या मार्गदर्शनात सहा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील निवडक शेतकऱ्यांनी राज्याबाहेर जाऊन संत्राविक्रीचे सर्वेक्षण केले.
७५० शेतकऱ्यांना प्रशिक्षण
समन्वयित कृषी विकास प्रकल्पा (केम) द्वारे अमरावती, यवतमाळ, वाशीम, अकोला, बुलडाणा व वर्धा जिल्ह्यातील ७५० संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले गेले. यात कुठला संत्रा पाठवायचा, निगा कशी राखायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ‘ए’ आणि ‘बी’ ग्रेडच्या संत्र्याला इतर राज्यातही मागणी आहे. संत्रा पिकविण्यासंदर्भात ‘केम’कडून वर्ग घेण्यात आले.