शेतीपयोगी साहित्याची बाजारात रेलचेल
By Admin | Updated: January 9, 2016 00:35 IST2016-01-09T00:35:53+5:302016-01-09T00:35:53+5:30
एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे.

शेतीपयोगी साहित्याची बाजारात रेलचेल
शेतमजूर, शेतकऱ्यांचा वाढता ओढा : डाले, टोपले, गुरांचे साहित्य, बैलबंडीचे सुटे भाग
चांदूरबाजार : एकेकाळी गुरांचे चांदूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरातील बाजारपेठेत आता शेतीपयोगी साहित्य मोठ्या प्रमाणात विक्रीला येत आहे. त्यामुळे आता शहराची गुरांचे चांदूर ही ओळख लोप पावत चालली आहे.
पूर्वी साखरेच्या तुलनेत गुळाचे भाव बरेच कमी होेते. त्यामुळे शेतमजूर आणि गरीब वर्ग गुळाचाच वापर करीत होते. अलिकडच्या काळात गुळाचे भाव साखरेच्या तुलनेत वधारले आहेत. त्यामुळे गूळ खरेदी करणाऱ्यांची संख्या घटत चालली आहे. गूळ विक्रेत्यांच्या व्यवसायावर त्याचा परिणाम जाणवू लागला आहे. चांदूरबाजार तालुक्याची जमीन सुपीक असून बागायतदारांचा तालुका म्हणूनही या भागाकडे पाहिले जाते. या भागात मोठ्या प्रमाणात ओलिताची शेती असल्याने शेतकऱ्यांकडे आर्थिक सुबत्ता दिसून येते. त्यामुळे शेतपयोगी साहित्याला आता बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. या भागात कापूस, तूर, सोयाबीन, हरभरा, गहू, संत्री ही पिके प्रामुख्याने घेतली जातात.
सध्या शहरातील शिवाजी चौकात गाय, बैल, म्हशीच्या गळ्यातील घंटा, खुरपे, विळे, कुऱ्हाडी, बैलगाडीसाठी लागणारे साहित्य असलेली दुकाने थाटलेली दिसून येतात. हे साहित्य लोहार समाजातील काही कुटुंब विक्रीसाठी उपलब्ध करून देतात. पूर्वी शेतकऱ्यांना हे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवारच्या आठवडी बाजाराची वाट पहावी लागत असे. आता मात्र हे साहित्य येथे केव्हाही उपलब्ध होते. औद्योगिकीकरणाच्या लाटेमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे.
आधुनिकीकरणाच्या लाटेमध्ये पारंपरिक व्यवसाय भरडले जात आहेत. अनेक ग्रामीण कारागिरांचे व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. वेताच्या काठ्या आणि कळकापासून तयार करण्यात येणाऱ्या टोपल्या, डाले काळाच्या ओघात दिसेनासे झाले. आता प्लास्टिकच्या डाले टोपल्यांचे दिवस असून हे डाले टोपले येथील बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहे. (तालुका प्रतिनिधी)