मुलीला एकटक पाहणे भोवले; तरूणाला ग्रामस्थांनी दिला चोप

By प्रदीप भाकरे | Updated: October 6, 2023 14:00 IST2023-10-06T13:57:37+5:302023-10-06T14:00:21+5:30

बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

man who molested a girl beaten by villagers | मुलीला एकटक पाहणे भोवले; तरूणाला ग्रामस्थांनी दिला चोप

मुलीला एकटक पाहणे भोवले; तरूणाला ग्रामस्थांनी दिला चोप

अमरावती : एका अल्पवयीन मुलीला एकटक पाहून तिचा विनयभंग करणे २१ वर्षीय तरूणास महागात पडले. ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले तथा बेदम चोप दिला. ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पोलिसांना देखील पाचारण केले. ४ ते ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी, बडनेरा पोलिसांनी पिडित मुुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी विशाल रामभाऊ राऊत (२१, रा. बार्शीटाकळी, ह.मु. पथ्रोट) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, वडिल व मुलगी अमरावतीला जेवण करण्यास आले असता आरोपी विशाल हा त्याच्या दुचाकीने त्यांच्याकडे आला. जवळीक साधण्याच्या उद्देशाने तिच्याकडे एकटक पाहू लागला. त्यावर मुलीच्या वडिलांनी त्याला हटकले असता, तो तेथून पळून गेला. ४ ऑक्टोबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र त्यानंतर तो मुलीच्या पाठोपाठ एका गावात पोहोचला. त्यावेळी बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काही ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला पकडले.

तो काही अंतरावर धावताना पडल्याने लोकांनी पकडून त्याला विचारणा केली असता, त्याने आपण त्या मुलीस भेटण्यास आल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला तेथे चांगलाच मार बसला. काही ग्रामस्थांनी ही माहिती बडनेरा पोलिसांनी दिली. पोलिसांनी तत्काळ तेथे पोहोचत त्याला ताब्यात घेतले. याप्रकरणी ५ ऑक्टोबर रोजी पहाटे ३.४५ च्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: man who molested a girl beaten by villagers