धक्कादायक! पित्याच्या मृत्यूनंतर साडीचोळीच्या बहाण्याने सर्वस्व लूटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 14:57 IST2021-12-08T14:49:32+5:302021-12-08T14:57:00+5:30
पीडिता ही तिच्या वडिलांच्या मयतीकरिता नाशिक येथे गेली. त्यावेळी सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर नितीन हा तिला साडीचोळी करण्याकरिता नाशिक येथील घरी घेऊन गेला. व रात्रीच्या वेळेस अचानक तिच्या खोलीत शिरून तिच्याशी बळजबरी केली.

धक्कादायक! पित्याच्या मृत्यूनंतर साडीचोळीच्या बहाण्याने सर्वस्व लूटले
अमरावती : विष देऊन जीवानिशी मारण्याची धमकी देऊन एका महिलेचे सर्वस्व लूटण्यात आले. नाशिक पाठोपाठ अमरावती गाठूनही त्याने तिच्यावर बळजबरी केली. साडीचोळीच्या बहाण्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग करणारा दुसरातिसरा कुणी नसून, तो तिचा मावसजावईच निघाल्याने पीडितासह तिच्या मावसबहिणीचे कुटुंब देखील हादरले.
२७ सप्टेंबर, १ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर रोजी या घटना घडल्या. याप्रकरणी नांदगाव पेठ पोलिसांनी नितीन आशू वाणी (३५, रा. कोयाळी, ता. रिसोड, जि. वाशिम, ह.मु. भारतनगर, नाशिक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारीनुसार, आरोपी नितीन हा पीडिताचा मावसजावई असून, तो नाशिकला राहतो. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात पीडिता ही तिच्या वडिलांच्या मयतीकरिता नाशिक येथे गेली. त्यावेळी सर्व सोपस्कार आटोपल्यानंतर नितीन हा तिला साडीचोळी करण्याकरिता नाशिक येथील घरी घेऊन गेला. तेथे असताना २७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आरोपी अचानक तिच्या खोलीत शिरला. तिचा गळा आवळला तथा विषाची बाटली तिच्यासमोर नाचवत तिच्याशी बळजबरी केली.
आरोपी एवढ्यावर थांबला नाही, तर १ ऑक्टोबर रोजी तो तिला जबरदस्तीने नाशिकमधील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिचेच छायाचित्रे दाखवत त्याने पुन्हा एकदा बळजबरी केली. वाच्यता केल्यास बदनामीची धमकी देण्यात आली. त्यानंतर ती अमरावतीला परतली. आरोपी नितीननेही तिच्या पाठोपाठ अमरावती गाठले. १० नोव्हेंबरला पाडिता ही घरी एकटी असल्याची संधी साधत तो तिच्या घरात शिरला. पुन्हा तिचेच अश्लील फोटो तिच्यासमोर नाचवत त्याने तिसऱ्यांदा तिचे सर्वस्व लुटले. विष पाजून जिवाने मारण्याची धमकी देण्यात आली.
नात्याचा विचार
मावसजावयाचे कृत्य उघड केल्यास मावसबहिणीचा संसार विस्कटेल, नातेही दुरावेल, त्यासमोर जाऊन आरोपीने विष देऊन जिवाने मारण्याची धमकी दिल्याने नाशिकमधील अत्याचारानंतर देखील तिने त्या कृत्याची कुठेही वाच्यता केली नाही. मात्र, नाशिक पाठोपाठ तो अमरावतीलाही पोहोचला. येथे देखील अत्याचार करण्यात आला. त्यामुळे ती नखशिखांत हादरली. अन् तिने ६ डिसेंबर रोजी नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठले. तेथे सहायक पोलीस निरीक्षक कविता पाटील यांच्याकडे तिने आपबिती कथन केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी नितीनविरुद्ध गुन्हा दाखल केला.
महिलेच्या तक्रारीवरून नाशिक येथील एकाविरुद्ध अतिप्रसंगांचा गुन्हा दाखल केला. घटनास्थळ नाशिकचे असल्याने तपासासाठी तो गुन्हा नाशिक पोलिसांकडे वर्ग करण्यात येईल.
प्रवीण काळे, ठाणेदार, नांदगाव पेठ