वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 15:19 IST2023-11-21T15:13:35+5:302023-11-21T15:19:27+5:30
अंजनगाव बारी येथील घटना; आकस्मिक मृत्यूनंतर खुनाचा गुन्हा दाखल

वर्ल्डकप हरण्याचा वाद; भावाने केली भावाची हत्या, वडील जखमी
बडनेरा (अमरावती) : दारूच्या नशेत दोन भाऊ व वडिलांमध्ये वर्ल्डकप हरण्यावरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यात भावाने भावाचाच खून केल्याची घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास अंजनगाव बारी येथे घडली. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
अंकित रमेश इंगोले (२८) असे मृताचे नाव आहे. प्रवीण रमेश इंगोले (३२) व रमेश गोविंद इंगोले (६५, तिघेही राह. अंजनगाव बारी) व अंकितमध्ये तो वाद झाला.
रविवारी रात्री साडेआठ ते अकराच्या सुमारास वडील आणि दोन सख्खे भाऊ घरातच दारू पिऊन बसले होते. क्रिकेट मॅच हरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. दरम्यान, आरोपीने शिवीगाळ केली. या सुमारास वडिलांनी आरोपी जवळचा मोबाइल हिसकला व त्याला फेकून मारला या रागात आरोपीने घरातून लोखंडी सलाख आणून अंकित यास गंभीर जखमी केले तसेच वडिलांच्या पायावरदेखील मारहाण केली.
या हाणामारीत अंकित याचा मृत्यू झाला व वडील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्रकरणी वडिलांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी भादंवि ३०२, ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नितीन मगर यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे. सहायक पोलीस आयुक्तांनी देखील घटनास्थळी भेट दिली.