धक्कादायक! आईनं कीटकनाशक आणलं; मुलानं ११ महिन्यांच्या बाळाला जीवे मारलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 07:01 IST2020-02-26T02:49:32+5:302020-02-26T07:01:49+5:30
पत्नीसह ११ महिन्यांच्या बाळाला पाजले विष; विवाहबाह्य संबंधात ठरत होते अडसर

धक्कादायक! आईनं कीटकनाशक आणलं; मुलानं ११ महिन्यांच्या बाळाला जीवे मारलं
अमरावती : विवाहबाह्य संबंध ठेवताना अडसर निर्माण होत असल्यामुळे पत्नीला पतीने आपल्या आईच्या मदतीने विष पाजले. पत्नीच्या कुशीतील ११ महिन्यांच्या बाळालाही त्या राक्षसी पित्याने विषाचे घोट पाजले. मदतीसाठी तडफडणाऱ्या मायलेकांना एका खोलीत बंद करून पती आणि त्याची आई निघून गेले. बाळ दगावले. २३ वर्षांच्या माऊलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे.
निर्दयतेचा कळस गाठणारे हे वास्तव मंगळवारी सायंकाळी पीडितेने पोलिसांना सांगितले. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलिसांनी पती कुलदीप मधुकर येवले आणि पीडितेची सासू आशा मधुकर येवले यांच्याविरुद्ध मंगळवारी खून, खुनाचा प्रयत्न, विवाहितेचा छळ या कलमांतर्गत गुन्हे नोंदवले.
आईने तिच्या चिमुकल्या बाळाला चमच्याने विष पाजून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा बनाव करण्यात आला होता. परंतु बेशुद्ध पत्नीला शुद्ध आल्यानंतर तिने दिलेल्या जबाबातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.