शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2022 16:15 IST2022-01-04T15:59:19+5:302022-01-04T16:15:51+5:30
शेकोटीजवळ बसून विडी फुंकण्याचा प्रकार एका व्यक्तीच्या जीवावर बेतला. विडी पेटवताना ठिणगी उडून टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली व यात ते होरपळल्या गेले.

शेकोटीजवळ बसून विडी पेटवताना ठिणगी उडाली, टेरिकॉटच्या लुंगीने आग पकडली अन्..
अमरावती : थंडीच्या दिवसात शेकोटी भोवती हात शेकत बसून गप्पा मारणे कुणाला नाही आवडत. पण, काळजी न बाळगल्यास ते जीवावरही बेतु शकते. अशीच एक घटना समोर आली असून शेकोटीजवळ बसून विडी पेटविताना ठिणगी उडून लुंगीने पेट घेतल्याने ५८ वर्षीय व्यक्ती गंभीररित्या जळाली. व ३ जानेवारी रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शाहिद अहमदखान हकीम खान (५८, रा. हबीबनगर) असे मृताचे नाव आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० च्या सुमारास घराच्या अंगणात शेकोटी पेटवून भोवती बसून विडी पेटवीत असताना काडीची ठिणगी त्याच्या लुंगीवर उडाली. कापड टेरिकॉटची असल्याने लुंगीला आग लागून त्यात त्यांची मांडी जळाली. ही आग विझविण्याच्या प्रयत्नात हातदेखील जळाले.
या घटनेत त्यांचे हातपाय भाजल्या गेल्याने त्यांना उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. २४ डिसेंबर रोजी त्यांना सुटी देखील झाली. मात्र, प्रकृती बिघडल्याने त्यांना २७ डिसेंबर रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते ४५ टक्के जळाल्याची नोंद रुग्णालयाने घेतली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.