जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी

By प्रदीप भाकरे | Updated: April 10, 2023 17:16 IST2023-04-10T17:14:50+5:302023-04-10T17:16:19+5:30

कॉलेजकन्येचा पाठलाग, विनयभंग

man booked for stalking, molesting and threatening the college girl | जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी

जेलमध्ये जाईल, परतून खुन्नस तर काढेनच, माथेफिरूची तरुणीला धमकी

अमरावती : तू माझा मोबाईल कॉल न उचलल्यास तुला मारून टाकेन. कारागृहातही जाईल, मात्र परत आल्यावर खुन्नस काढल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्भित धमकी एका कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थिनीला देण्यात आली. ६ एप्रिल रोजी येथील एका कॉलेजबाहेर हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी, गाडगेनगर पोलिसांनी ९ एप्रिल रोजी आरोपी रवि किसनराव धुर्वे (रा. अमरावती) याच्याविरुद्ध विनयभंग, मारहाण, धमकी व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, यातील अल्पवयीन पीडिता ही एका कनिष्ट महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ६ एप्रिल रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास महाविद्यालयातील क्लास संपवून ती बाहेर पडली. त्यावेळी आरोपीने त्याची दुचाकी अचानक अगदी वेगाने तिच्यासमोर आणली. तिची छेड काढत तिच्या गालावर थापड मारली. तू माझा फोन उचलला नाही, तर तुला मारून टाकेन, आईवडिलांना सांगितल्यास मी जेलमध्ये जाईन, मात्र तिकडून परत येताच त्यांना जिवे मारल्याशिवाय राहणार नाही. जेलमधून परत आल्यानंतर खुन्नस काढल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्भित धमकी त्याने दिली.

फोनवरून त्रास

त्या माथेफिरू धमकीने ती नखशिखांत हादरली. कशीबशी घरी पोहोचली. आईच्या कुशीत शिरून तिने दुपारचा प्रसंग तिला सांगितला. ८ एप्रिल रोजी उशिरा रात्री तिने आईसह गाडगेनगर पोलीस ठाणे गाठले. आरोपी रवी हा गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या मोबाईलवर कॉल करून प्रचंड त्रास देत असल्याचे देखील तिने तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: man booked for stalking, molesting and threatening the college girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.