विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग
By प्रदीप भाकरे | Updated: April 27, 2023 13:48 IST2023-04-27T13:46:47+5:302023-04-27T13:48:00+5:30
देहव्यवसायाचा आरोप

विधवा महिलेच्या घरात घुसून धुडगूस, विनयभंग
अमरावती : विधवा महिलेच्या घरात शिरून तिचा विनयभंग करण्यात आला तसेच पतीच्या मृत्यूनंतर ती देहव्यवसाय करत असल्याचा अश्लील आरोप करण्यात आला. २५ एप्रिल रोजी रात्री ही घटना घडली.
यातील आरोपी प्रवीण हिरालाल खंडारे (३२, रा. टोपेनगर) हा रात्री ९:३० च्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत या महिलेच्या घरासमोर पोहोचला. तिच्या घराचे दार मोठ्याने वाजवत ‘माझी बायको तुझ्याकडे आहे का?’ अशी विचारणा तिला केली. त्यावर ‘ती येथे नाही, तुम्ही दारू पिऊन आहात, मी दरवाजा उघडत नाही,’ असे तिने बजावले. त्यावर आरोपी प्रवीण याने बंद दाराला जोरजोरात लाथा मारल्या. जोराने लाथ मारल्याने दार उघडले.
यानंतर आरोपीने तिच्या घरात प्रवेश केला. महिलेचे केस पकडून तिला मारहाणदेखील केली. तसेच अश्लील शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. तिच्यावर देहव्यवसायाचा आरोप केला. या प्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी २६ एप्रिल रोजी आरोपी प्रवीण खंडारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.