Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 04:22 AM2019-10-10T04:22:58+5:302019-10-10T04:25:03+5:30

कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे.

Maharashtra Election 2019: Challenges for novice politicians | Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

Maharashtra Election 2019 : मुरब्बी राजकारण्यांपुढे नवख्यांचे आव्हान

googlenewsNext

- गणेश देशमुख

अमरावती जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार पुन्हा रिंगणात आहेत. त्यातील पाच आमदारांना किमान दोन टर्मचा अनुभव आहे. मुरब्बी राजकारण्यांच्या डावपेचात रंगलेले जिल्ह्यातील राजकारण नवख्यांना किती पालटवता येईल, हे बघणे रंजक ठरणार आहे.
कोरकू-गोंड आदिवासींचे प्राबल्य असलेला मेळघाट मतदारसंघ हा एसटी राखीव, तर राजकीय घडामोडींना तात्काळ प्रतिसाद देणारा दर्यापूर मतदारसंघ हा एससीसाठी राखीव आहे. या दोन्ही मतदारसंघांत मर्यादित घडामोडी अपेक्षित असताना यावेळी अनपेक्षितपणे त्या लक्षवेधक ठरल्या. मेळघाटात विद्यमान आमदार प्रभुदास भिलावेकर यांचे तिकीट भाजपने कापले. ते रमेश मावस्कर यांना मिळाले; परंतु आशा लावून बसलेले माजी आमदार राजकुमार पटेल नाराज होऊन ऐनवेळी बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाकडून, तर काँग्रेसचे केवलराम काळे राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरले. दर्यापुरात विद्यमान आमदार रमेश बुंदिले यांना रिपाइंतून आलेल्या; पण ‘पंजा’वर उभे असलेल्या बळवंत वानखडे यांचे आव्हान आहे.
अमरावतीत भाजपच्या सुनील देशमुखांना काँग्रेसच्या सुलभा खोडके यांचे आव्हान आहे. अचलपुरातून अपक्ष आमदार बच्चू कडू हे चौथ्यांदा रिंगणात आहेत. तिवस्यात काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर विरुद्ध शिवसेनेचे राजेश वानखडे अशी लढत असेल. वरूडमधून मावळते कृषिमंत्री अनिल बोंडे यांना शेतकरी स्वाभिमानीच्या देवेंद्र भुयार यांनी आव्हान दिले आहे. माळी समाजाच्या गठ्ठा मतांवर तेथील राजकीय निर्णायकता अवलंबून असेल.

प्रचारातील प्रमुख मुद्दे
१) शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी. शेतमालाला भाव.
२) नागरी सुविधा. शहरी विकास. महिला सक्षमीकरण.
३) काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका हा भाजप-सेनेचा प्रचारातील प्रमुख मुद्दा
४) भ्रष्टाचारमुक्त शासन. गतिमान प्रशासन.

रंगतदार लढती
मेळघाट मतदारसंघातील लढत अचानक रंगतदार झाली आहे. लढत तिहेरी आहे. महसूल उपायुक्त रमेश मावस्कर हे नोकरी सोडून रिंगणात उतरले. माजी आमदारद्वय केवलराम काळे आणि राजकुमार पटेल यांनीही दंड थोपटले आहेत. निवडणुकीतील रंगत तेथे वाढतच जाणार आहे.
धामणगाव मतदारसंघात काँग्रेसचे आमदार वीरेंद्र जगताप चौथ्यांदा रिंगणात आहेत. भाजपने फ्रेश चेहरा असलेल्या नितीन धांडे यांचे तिकीट कापून ऐनवेळी आमदार अरुण अडसड यांचे पुत्र प्रताप यांना उमेदवारी दिली.
बडनेरा मतदारसंघात अपक्ष आमदार रवि राणा यांना शिवसेनेच्या प्रीती संजय बंड यांनी आव्हान दिले आहे. रवि राणा हे आमदार आणि त्यांच्या पत्नी नवनीत या खासदार आहेत. दोघेही अपक्ष. भाजप-सेनेशी जवळीक साधून आघाडीच्या समर्थनाने रिंगणात असलेल्या रवि राणा यांना यावेळी कौशल्य पणाला लावावे लागेल.

Web Title: Maharashtra Election 2019: Challenges for novice politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.