महा शिवपुराण कथा; कलश यात्रेदरम्यान महिला दगावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:45 IST2024-05-06T13:44:09+5:302024-05-06T13:45:56+5:30
परतवाड्यातील घटना: अटी-शर्तीचा भंग; आयोजकांविरुद्ध गुन्हे

Maha Shivpuran; Woman died during Kalash Yatra
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पं. प्रदीप मिश्रा यांच्या महा शिवपुराण कथेच्या अनुषंगाने काढण्यात आलेल्या कलश यात्रेदरम्यान एक महिला कोसळली आणि मृत्युमुखी पडली. अन्य एक महिला गंभीर जखमी झाली आहे. रविवारी ही घटना घडली. ललिता सुभाष बाळापुरे (५८, रा. कांडली) असे मृत महिलेचे नाव आहे. महा शिवपुराण कथेनिमित्त रविवारी सकाळी साडेसहापासून कलश यात्रेला प्रारंभ झाला. यात सहभागी झालेल्या ललिता भोवळ येऊन कोसळल्या. त्यांना तत्काळ रुग्णालयात हलविले. दोन खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. तर, दुसरी महिला वाघामातालगत भोवळ येऊन रस्त्यावर कोसळली. यात ती गंभीर जखमी झाली. पण, या महिलेचे नाव कळू शकले नाही. तापमान वाढल्याने कलश यात्रेत सहभागी महिलांना पायाखाली चटके लागत होते, कथास्थळी पाण्याची व्यवस्था नसल्याने तेथील कुलर पाण्याविना उष्ण हवा फेकत होते.
परवानगी वाघामातापर्यंत, कथास्थळी नेली यात्रा
कलश यात्रेकरिता पोलिसांनी टिळक चौक ते वाघामाता अशी परवानगी दिली होती. सकाळी साडेसहाला सुरू झालेली कलश यात्रा नऊ वाजताच्या दरम्यान वाघामाता परिसरात पोहोचली. तिथे यात्रेचे विसर्जन अपेक्षित होते. पण, काही अतिउत्साही मंडळींनी प्रशासनाच्या अटी-शर्ती पायदळी तुडवत हजारो महिलांसह ही कलश यात्रा कथास्थळी नेली.
पोलिसांत गुन्हा नोंद
कलश यात्रेचे नियोजित अंतर वाढल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, अंजनगाव रोडवरील वाहतूक जाम झाली. दरम्यानही काही महिला चक्कर येऊन जमिनीवर कोसळल्या. त्यामुळे परतवाडा पोलिसांनी ओम जयस्वाल, प्रकाश जयस्वाल, अमोल जयस्वाल, अजय मोरयांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती परतवाड्याचे ठाणेदार संदीप चव्हान यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कार्यक्रमाला परवानगी देण्यात आली आहे. व्यवस्था आणि महिलेच्या मृत्यूविषयी माहिती नाही. माहिती घेतली जाईल.
- डॉ. संजय गरकल, तहसीलदार, अचलपूर
कलश यात्रेदरम्यान अटी- शर्तीचा भंग केल्यावरून चौघांविरुद्ध गुन्हे दाखल केले, कलश यात्रा पहाटेच निघाली होती. मात्र गर्दीमुळे पुढे तिला उशिर झाला.
- विशाल आनंद, पोलिस अधीक्षक,
खंडित वीजपुरवठा, अपुरे व्होल्टेज यामुळे पाणी व्यवस्थेत व्यत्यय येत होता. पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. गैरसोय होणार नाही.
- प्रकाश जयस्वाल, परतवाडा