धक्कादायक! लव्ह, ब्रेकअप अन् फेसबुकवर पुन्हा‘ती’चे फोटोज! सोशल बदनामी; आरोपी मुंबईचा
By प्रदीप भाकरे | Updated: March 5, 2023 14:20 IST2023-03-05T14:20:39+5:302023-03-05T14:20:53+5:30
चार पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमात राहून अलिकडे त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, त्याच्या मनातून ती काही केल्या निघाली नाही.

धक्कादायक! लव्ह, ब्रेकअप अन् फेसबुकवर पुन्हा‘ती’चे फोटोज! सोशल बदनामी; आरोपी मुंबईचा
अमरावती-चार पाच वर्षे एकमेकांच्या प्रेमात राहून अलिकडे त्यांचे ब्रेकअप झाले. मात्र, त्याच्या मनातून ती काही केल्या निघाली नाही. त्यामुळे त्याने तिला ऑनलाईन त्रास देणे सुरू केले. तो त्रास डोक्यात गेल्याने अखेर तिने पोलीस ठाणे गाठले. ब्रेकअपनंतरही पाठलाग करणे त्याला चांगलेच महागात पडले. अन् त्याची ब्रेकअपनंतरची हुशारी त्याला पोलीस ठाण्यात घेऊन गेली.
याप्रकरणी एका तरूणीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी आरोपी विश्वजित दत्तात्रय देशपांडे (२९, नवी मुंबई) याच्याविरूध्द ४ मार्च रोजी रात्री विनयभंग व बदनामीचा गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, फिर्यादी तरूणीची आरोपीशी सोशल मिडीयावर मैत्री झाली. मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांचे चार ते पाच वर्षे प्रेमसंबंध होते. त्यांच्यात भेटीगाठीही होत होत्या. सोशल मिडियावर तासनतास संवाद होत असताना आरोपी आपल्याला अकारण त्रास देत असल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे तरूणीने त्याच्याशी ब्रेकअप केले होते.
त्यानंतर काही महिने तो शांत राहिला. मात्र मागील सात महिन्यांपासून आरोपीला तिला वारंवार मोबाईल कॉल करून त्रास देऊ लागला. दोघांनी सोबत काढलेले जवळीकीचे फोटो सोशल मिडीयावर ठेऊन आरोपीने तिची बदनामी चालविली आहे. त्यामुळे नातेवाईकांमध्ये तिची बदनामी होत असल्याचे तरूणीने तक्रारीत म्हटले आहे.
वो है की मानताही नही! आरोपी विश्वजितने तरूणीच्या भावाच्या फेसबुक अकाउंटवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याने त्याच्या फेसबुकच्या प्रोफाईलवर तक्रारकत्या तरूणीचा फोटो डीपी म्हणून ठेवला. आरोपी हा वारंवार आपल्यासोबतचे फोटो सोशलमिडीयावर अपलोड व शेअर करून आपली बदनामी करत आहे. त्यामुळे आपल्याला टोकाचा शारीरिक व मानसिक त्रास होत असल्याचे तरूणीने ४ मार्च रोजी रात्री ९ च्या सुमारास राजापेठ पोलिसांत नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.