लोटांगण, लिंबूचे काप अन् पशुंचे बळी
By Admin | Updated: May 4, 2017 00:13 IST2017-05-04T00:13:48+5:302017-05-04T00:13:48+5:30
सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या विदर्भाच्या नंदनवनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ....

लोटांगण, लिंबूचे काप अन् पशुंचे बळी
‘नवसाच्या यात्रेत’ अंधश्रद्धेचा कहर : देवी पॉइंटवर आदिवासींची गर्दी, विज्ञानयुगातील धक्कादायक प्रकार
चिखलदरा : सातपुड्याच्या पर्वतराजींमध्ये वसलेल्या विदर्भाच्या नंदनवनाचे प्रमुख आकर्षण असलेल्या ‘देवी पॉइंट’वरील जनादेवीची ‘नवसाची यात्रा’ सध्या सुरू असून या हायटेक युगातही शेकडो आदिवासी येथे कोंबड्या, बकऱ्यांचा बळी देऊन नवसपूर्ती करीत असल्याचे क्लेशदायक चित्र आहे.
दीड महिनापेक्षा अधिक काळ चालणाऱ्या या यात्रेत मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा-अर्चा करून प्राण्यांचा बळी दिला जातो. चैत्र महिन्यात ही आदिवासींची पारंपारिक यात्रा सुरू होते. मृगाच्या सरी कोसळेपर्यंत यात्रा सुरू असते. मेळघाटातील धारणी, चिखलदऱ्यासह मध्यप्रदेशातील भैसदेही, खंडवा आगदी परिसरातील आदिवासी, कोरकू लोकांची ही ‘नवसपूर्र्ती’ची पुरातन परंपरा विज्ञानयुगातही कायम आहे, हे विशेष. या यात्रेला येत असलेले विभत्स रूप पाहता काही दिवसांपूर्वी मंदिर व्यवस्थापनासह जिल्ह्याबाहेरील काही जागरूक व समाजसेवी नागरिकांनी या नवसाच्या यात्रेला कायद्याने बंदी घालण्याची मागणी केली असून आदिवासींमध्ये जनजागृतीचा प्रयत्नही केला. मात्र, तो निष्फळ ठरला.
अंगात देवी अन् हातात लिंबू
नवसाच्या यात्रेत ज्याचा नवस फेडायचा आहे त्यांच्या कुटुंबासह गावातील एखादा सदस्य देखील येतो. यापैकी कुणाच्याही अंगात देवी संचारते. मग, त्या व्यक्तिची देवी समजून पूजा केली जाते. त्या व्यक्तिच्या अंगात संचारलेली ही देवी मग मंदिराच्या पायऱ्यांवरून लोटांगण घालून थेट खाली उतरते. मग, येथील मांत्रिक लिंबू कापून मंत्रोच्चारासह आजारी व्यक्तिच्या अंगावरून उतरवून दोन्ही दिशांना फेकतो. इतकेच नव्हे तर अंगात आलेली ही देवी मंदिरातील देवीसोबत संवादही साधते. अंधश्रद्धेच्या या गर्तेत अनेक सुशिक्षितांचा भरणा देखील दिसून येतो.
कापलेला बोकड, कोंबड्याचा प्रसाद
नवसाची पूजा करताना बोकड, कोंबड्याची पूजा करून त्यांचा बळी दिला जातो. या मुक्या प्राण्यांच्या रक्ताचे काही थेंब प्रसाद म्हणून देवीला वाहिले जातात. मात्र, अलिकडे ही बळीप्रथा व पूजा देवी पॉर्इंटच्या वरील भागात केली जाते. मंदिर परिसरात फक्त पूजेची परवानगी आहे. कापलेल्या पशुंचे मटण शिजवून त्याचे जेवण दिले की नवसाची पूर्तता झाली, असे मानतात. अलिकडे या नवसाच्या यात्रेला मांसाहारी खवय्यांनी पसंती दर्शविल्याने या यात्रेला एखाद्या पार्टीचे रूप आले आहे.
कातळातील देवीचे मंदिर
हे मंदिर एका विशालकाय कातळामध्ये स्थित आहे. जनादेवीसमोर बोललेला नवस पूर्ण होतोच, अशी आदिवासींची श्रद्धा आहे. हा नवस पूर्ण झाला की कोंबडा, बकरा कापून तो फेडला जातो. कपारीत असलेल्या या मंदिरात शेकडो आदिवासी अंगावर पाण्याचे तुषार झेलत नवसपूर्ती करतात.