Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना ‘अॅप’चे वावडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 13:31 IST2019-03-29T13:29:59+5:302019-03-29T13:31:34+5:30
आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे.

Lok Sabha Election 2019; अमरावती जिल्ह्यातील उमेदवारांना ‘अॅप’चे वावडे
गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आधुनिक तंत्रज्ञनाच्या युगात लोकसभा निवडणुकीतदेखील कामे सुलभ व्हावीत, एकाच खिडकीवर सर्व परवानग्या मिळाव्यात, यासाठी आयोगाने नवनवीन अॅपची निर्मिती केली. मात्र, एकाही उमेदवाराने या अॅपचा फायदा घेतलेला नसल्याचे दिसून येत आहे. आचारसंहिता भंगाची तक्रार करता येणे सोयीचे व्हावे, यासाठीही अॅप आहे. मात्र, या अॅपवर आतापर्यंत एकही तक्रार पुराव्यानिशी आलेली नाही.
प्रत्येक निवडणुकीत उमेदवारांची भाऊगर्दी व यामध्ये तासन्तास जाणारा वेळ वाचावा, यासाठी भारत निवडणूक आयोगाद्वारे यावेळी प्रथमच अॅपची निर्मिती करण्यात आली. यामध्ये निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना घरबसल्या उमेदवारी अर्ज करता यावा, यासाठी समाधान अॅप निर्माण करण्यात आले. हे ऑप आता नॅशनल गिव्हीनन्स सर्व्हिस पोर्टल (एनजीएसपी) या नावाने आहे. मात्र, या अॅपवर एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. अत्यंत कमी दिवसांत लाखो मतदारांपर्यत उमेदवाराला जायचे असल्याने त्याचा प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे आता निवडणुका, उमेदवार, आयोग अन् यंत्रणादेखील हायटेक होत असल्यान निवडणूक कार्यालयापर्यंत येण्याची पायपीटच नको व त्याद्वारे होणारा उमेदवारांचा लाखो रुपयांचा खर्च टाळता यावा, यासाठी आयोगाद्वारे ही संकल्पना प्रथमच राबविण्यात आली. मात्र, उमेदवारी दाखल करण्याच्या सहाही दिवसांत एकाही उमेदवाराने या हायटेक तंत्रज्ञानाचा वापर केला नाही. त्यापेक्षा स्वत: निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याला प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले.
निवडणूक म्हटले की, कमी दिवसात अधिकाधिक कामे करण्याकडे यंत्रणेसह उमेदवारांचा कल असतो हे हेरून आयोगाने यावेळी ‘सुविधा’ या अॅपद्वारे उमेदवारांना सुविधा दिल्यात.
हे अॅप म्हणजे उमेदवारांसाठी जनू एक खिडकीच आहे. सर्व विभागाशी सबंधित सर्व परवानगी एकाच ठिकाणी मिळाव्यात यासाठी हे अॅ प महत्वपूर्ण आहे. या अॅपवर सभेसंदर्भात परवानगी मिळत असतांना एकाही उमेदवाराद्वारा या अॅपचा वापर करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे सुगम अॅपवर निवडणूक वाहनासंबंधी परवानगी मिळते. मात्र, सद्यस्थितीत एकाही वाहनाची परवानगी या अॅपद्वारे मागण्यात आलेली नसल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली.
‘सी व्हिजिल’चा वापरच नाही
निवडणूक प्रक्रियेत जर मतदारांना उमेदवारांना प्रलोभने दिली जात असतील, तर आदर्श आचारसंहितेचा भंग होतो. राजकारण्यांशी विरोध नको म्हणून अनेकदा नागरिक तक्रार करण्याचे टाळतात. त्यामुळे नाव न जाहीर करता, तक्रार करता येण्यासाठी यावेळी आयोगाद्वारे सी व्हिजिल अॅपची निर्मिती करण्यात आली. या अॅपवर आतापर्यंत १२ तक्रारी करण्यात आल्यात. यापैकी तक्रारीमध्ये तथ्य न आढळल्यामुळे त्या निकाली काढण्यात आल्या. त्यामुळे निवडणूक काळात महत्त्वपूर्ण मतदार अन् उमेदवारांनी अॅपचे गांभीर्य जाणले नसल्याची वस्तुस्थिती आहे.
निवडणूक प्रक्रियेत सुलभता यावी, यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर व्हावा तसेच एकाच ठिकाणी परवानग्या मिळाव्यात व याद्वारे मतदार व उमेदवार यांना सर्वतोपरी साहाय्य व्हावे, यासाठी अॅप उपलब्ध आहेत. या सर्व सुविधांचा वापर मतदार व उमेदवारांना करण्याबाबत सूचना निवडणूक विभागाने केल्या आहेत.
- अरुण रणवीर, जिल्हा सूचना,विज्ञान अधिकारी