पश्चिम विदर्भातील सात प्रकल्पांत सहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 18:44 IST2019-08-03T18:44:29+5:302019-08-03T18:44:45+5:30
पाणलोट क्षेत्रात पावसाची गरज : पाच प्रकल्पांना कोरड

पश्चिम विदर्भातील सात प्रकल्पांत सहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा
संदीप मानकर/अमरावती : पश्चिम विदर्भातील सात प्रकल्प अद्यापही तहानलेलेच असून, त्यात सरासरी सहा टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही प्रकल्पांना अद्यापही कोरड लागली आहे. ३ आॅगस्ट रोजी जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, ५०२ प्रकल्पांत सरासरी २३.६९ टक्के पाणीसाठा आहे.
काटेपूर्णा (जि. अकोला) या मोठ्या प्रकल्पात फक्त ३.४७ टक्के, पेनटाकळी (जि. बुलडाणा) प्रकल्पांत शून्य टक्के पाणीसाठा असल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये अकोला जिल्ह्यातील निर्गुणा, उमा व घुगंशी बॅरेज तसेच सोनल (जि. वाशिम), कोराडी (जि. बुलडाणा) मध्यम प्रकल्पांत शून्य टक्के जलसाठा आहे. अडाण (जि. यवतमाळ) मध्यम प्रकल्प ५.४९ टक्के पाणीसाठा आहे. यंदा पाणलोट क्षेत्रात अपेक्षित पाऊस न झाल्याने पाणीसाठा साचला नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
दोन मध्यम प्रकल्पांत
शंभर टक्के पाणीसाठा
एकीकडे काही प्रकल्पांना कोरड लागली असताना सायखेडा (जि. यवतमाळ) व पलढग (जि. बुलडाणा) मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्यामुळे परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्यासह सिंचनाचीही चिंता मिटली आहे.