बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम
By गणेश वासनिक | Updated: October 29, 2023 14:33 IST2023-10-29T14:32:45+5:302023-10-29T14:33:51+5:30
स्वंयभू वन्यजीव प्रेमींचा धुमाकूळ, रात्रीला मोबाईल टार्चद्वारे परिसरात बिबट्याची शोधमोहीम

बिबट्या कॅमेऱ्यात कैद नाहीच; पण अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात मुक्काम
अमरावती : गत दीड महिन्यांपासून शासन-प्रशासकीय यंत्रणेला वेठीस धरणारा बिबट हल्ली येथील शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था (व्हीएमव्ही) परिसरातच दबा धरून आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने सहा ट्रॅप कॅमेरे बसविले. मात्र, कॅमेऱ्यांना सुद्धा चकमा देत तो आडमार्गाने शिकारीच्या शोधात नागरी वस्तीकडे ये-जा करीत असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे स्वंयभू वन्यजीव एनजीओ बिबट्याचा शोध घेण्यासाठी रात्री-अपरात्री मुक्त संचार करीत असल्याचे वास्तव आहे.
व्हीएमव्ही परिसरात दिवसा रेस्क्यू पथक तर रात्रीला वन विभागाचे कर्मचारी बिबट्याच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आले आहे. सोबतीला पोलिसांची चमूदेखील असते. गत आठवड्यात बुधवार, २५ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेसात वाजता व्हीएमव्हीच्या मागील बाजूस असलेल्या मणिपूर प्लॉट परिसरात बिबट आढळून आला. तो शिकारीच्या शोधात गेला असावा, असा अंदाज वन विभागाचा आहे. मात्र, लोकांच्या गर्दीमुळे तो बिथरून गेला आणि स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळत सुटला. तब्बल १४ तासांच्या प्रतीक्षेनंतर लोकांच्या नजरा चुकवून बिबट हा पुन्हा अधिवास असलेल्या परिसरात गेला. गत चार दिवसांपासून तो व्हीएमव्ही परिसरातच आहे. नेमका तो कोठे आहे, काय खातो, कधी बाहेर पडतो? याचा शोध घेण्यासाठी वन विभागाने सहा ट्रॅप कॅमेरे महत्वाच्या भागात बसविले. परंतु, या एकाही कॅमेऱ्यात तो कैद झाला नाही. तथापि, शुक्रवारी रात्री प्रत्यक्षात वन कर्मचाऱ्यांना तो झाडी-झुडपात दिसून आला. त्यामुळे बिबट्याचा मुक्काम व्हीएमव्ही परिसरातच असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच भागात पोलिस, वन कर्मचाऱ्यांची गस्त कायम आहे.
व्हीएमव्ही परिसरात वॉकिंगला मनाई
शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था अर्थात जुने व्हीएमव्हीच्या संचालक डॉ. अंजली देशमुख यांनी २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी एका पत्राद्वारे परिसरात बिबट आहे. त्यामुळे या भागात विद्यार्थी, नागरिकांनी वाकिंगसाठी ये-जा करून नये. काही अप्रिय घटना घडल्यास स्वत: जबाबदार राहणार, असे म्हटले आहे. सकाळ, सायंकाळी वॉकिंगला येणे टाळावे, असे या पत्रात नमूद आहे.