कोरोनात बिबट्याची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 05:00 IST2020-05-19T05:00:00+5:302020-05-19T05:00:24+5:30
खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट मादीसह बछड्याने एकत्रित दर्शन दिल्याची माहिती आहे.

कोरोनात बिबट्याची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : कोरोनात बिबट्याच्या दहशतीने अचलपूर तालुक्यातील सात गाववासी भयभीत झाले आहेत. दररोज हा बिबट कुणाला ना कुणाला दर्शन देत आहे. दर्शन देत कोरोनात दहशत पसरविणाऱ्या या बिबट्याच्या विरोधात ग्रामस्थांनी वनविभागासह पोलिसांकडे तक्रार केली आहे.
खैरी, दोनोडा, वासनी, वाढोणा शिवारात १० मे पासून या बिबट्याची दहशत पसरली आहे. ग्रामस्थांच्या तक्रारींच्या अनुषंगाने आसेगाव पोलिसांनी याबाबत वनाधिकाऱ्यांकडे मौखिक विचारणा केली आहे. वन विभागाने त्या परिसरात गस्त वाढविली आहे. एका ट्रॅक्टरचालकाला तर बिबट मादीसह बछड्याने एकत्रित दर्शन दिल्याची माहिती आहे.
गस्ती दरम्यान परतवाडा वनपरिक्षेत्रांतर्गत दर्यापूर वर्तुळातील गस्तीवरील पथकाला खैरी दोनोडा शिवारात या बिबट्याच्या पावलांचे ठसे मिळाले आहेत. या पावलांच्या ठशांचे प्लास्टर कास्टही घेण्यात आलेले आहेत.
अचलपूर तालुक्यातील खैरी शिवारात यापूर्वी २५ एप्रिल रोजी लोखंडी ट्रॅपमध्ये एक बिबट अडकला होता. हा बिबट सध्या परतवाडा येथील वाघाच्या दवाखान्यात ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरला उपचार घेत आहे.
दरम्यान १० मे पासून त्याच खैरी शिवारासह दोनोडा, वासनी, वाढोणा, अचलपूर-रासेगाव मार्गावरील गोपी धाबा, अंजनगाव रोडवरील लोकांना बिबट्याचे दर्शन झाले आहे. दिसत असलेल्या बिबटाची माहिती वेळोवेळी वनपरिक्षेत्र कार्यालयाला नागरिकांकडून देण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीच्या आधारे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप भड यांच्या नेतृत्वात दर्यापूर वनपरिक्षेत्राचे वनपाल डी. बी. सोळंके, डी. सी. लोखंडे, राजू काळे यांच्यासह वनरक्षक नितीन अहिरराव, प्रशांत उमक, प्रदीप बाळापुरे, प्रवीण निर्मळ, धुमाळे, एस. जी. बरवट, पवार आणि वनाधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक त्या-त्या भागांत गस्त घालीत आहेत.
बिबट्याची दहशत बघता वनविभागाने रात्रीलाही आपली गस्त वाढविली आहे. पण, खैरी दोनोडा शेतशिवार वगळता कुठेही बिबट्याच्या पावलाचे ठसे वनविभागाला आढळून आलेले नाहीत. मागील आठ दिवसांपासून या बिबट्याच्या मागे वनविभागाची गस्त सुरू आहे. गावकरी मात्र बिबट्याच्या दर्शनाने भयभीत झाले आहेत. त्याचा बंदोबस्त लावण्याची मागणी ते करीत आहेत.