विदर्भातील करोडोंच्या भूदान जमिनी शिक्षण संस्थांच्या घशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:40 AM2018-07-24T11:40:30+5:302018-07-24T11:45:19+5:30

आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

lands of crores are swallowed by educational institutions in Vidarbha | विदर्भातील करोडोंच्या भूदान जमिनी शिक्षण संस्थांच्या घशात

विदर्भातील करोडोंच्या भूदान जमिनी शिक्षण संस्थांच्या घशात

Next
ठळक मुद्देअधिनियमाला बगलभूदान यज्ञ मंडळाला महसूल अधिकाऱ्यांचेही बळ

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीदरम्यान दानात मिळालेल्या जमिनींपैकी भूदान यज्ञ मंडळाने विदर्भातील २०.८० हेक्टर जमीन अधिनियमाला हरताळ फासून चक्क शिक्षणसंस्थांना वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २०१४ ते १८ या काळात आठ शिक्षण संस्थांना वाटप करण्यात आलेल्या या जमिनींचे बाजारमूल्य कोट्यवधी रुपयांचे आहे.
विशेष असे की, भूदान मंडळाकडून केली जाणारी नियमबाह्य कामे रोखण्याची जबाबदारी ज्यांच्या शिरावर होती, त्या महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनीही नियमांचे उल्लंघन करून सदर संस्थांच्या नावे फेरफार नोंदवून घेतले. भूदान यज्ञ मंडळ, लाभार्थी शिक्षण संस्था आणि महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी संगनमताने भूदान कायद्याला मूठमाती दिल्याचे या प्रकरणातून उघड होते. शासनाने यासंबंधाने खोलवर तपास केल्यास अनेक धक्कादायक खुलासे होणार आहेत.

काय म्हणतोे नियम?
भूदान यज्ञ अधिनियम १९५३ चे कलम ३ अन्वये शासनाद्वारे गठित भूदान यज्ञ मंडळाला कलम २२ अन्वये स्वत: वाही-पेरी करू शकणाऱ्या भूमिहीन शेतमजुरास भूदान जमिनीचे वाटप करण्याचे अधिकार आहेत. कलम २३ मधील तरतुदीनुसार वाटप केलेल्या शेतजमिनीची गावाच्या अधिकार अभिलेखात संबंधिताच्या नावे भूमिधारी अशी नोंद करण्यात येईल, असे कलम २४ मध्ये नमूद आहे. म्हणजेच वाटप झालेल्या जमिनी भूमिहीन शेतमजुरांच्या नावे नोंद करण्याचे कायद्याने बंधन आहे.

काय आहे भूदान चळवळ?
आचार्य विनोबा भावे यांनी ७ मार्च १९५१ रोजी सेवाग्राम येथून  पदयात्रा सुरू केली. १८ एप्रिल १९५१ रोजी पदयात्रा सध्याच्या तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावी पोहोचली. याच ठिकाणी त्यांनी ‘सब भूमी गोपाल की’ अशी घोषणा करून देशातील जमीनदारांकडे भूमिहिनांसाठी जमिनी मागण्याचा प्रयोग सुरू केला. त्यासाठी विनोबाजींनी तब्बल ४० हजार मैल पदयात्रा केली. दान मिळालेली लाखो हेक्टर जमीन तत्कालीन भूदान समित्यातर्फे भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली गेली.

गावाच्या विकासासाठी भूदान जमीन द्यावी, या मताचा मी नाही. आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ भूमिहीन शेतमजुरांसाठी उभारली. दानातील जमिनींचा याच माध्यमासाठी उपयोग व्हावा, असे माझे मत आहे.
-एकनाथ डगवार, सचिव, भूदान यज्ञ मंडळ, यवतमाळ

Web Title: lands of crores are swallowed by educational institutions in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.