पालिकेच्या लेखापालाच्या घरात सापडले लाख रुपये, कोर्टाकडून जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2018 20:30 IST2018-08-09T20:26:46+5:302018-08-09T20:30:03+5:30
अचलपूर नगरपालिकेचा लाचखोर लेखापाल संतोष बंग याला अचलपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. देशपांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला.

पालिकेच्या लेखापालाच्या घरात सापडले लाख रुपये, कोर्टाकडून जामीन मंजूर
परतवाडा (अमरावती) : अचलपूर नगरपालिकेचा लाचखोर लेखापाल संतोष बंग याला अचलपूर जिल्हा सत्र न्यायाधीश एच. एम. देशपांडे यांच्या न्यायालयाने गुरुवारी जामीन मंजूर केला. यावेळी न्यायालय परिसरात पालिकेचे अधिकारी, पदाधिकारी व नगरसेवकांनी एकच गर्दी केली होती.
बुधवारी दुपारी 12.30 वाजता कंत्राटदाराकडून 80 हजार रुपयांची लाच घेताना लेखापाल संतोष बंग याला लाचलूचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पालिकेतील त्यांच्याच पक्षात रंगेहाथ अटक केली होती. या घटनेने पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली होती.
न्यायालयात गर्दी, रात्र काढली दवाखान्यात
लाचखोर लेखापाल संतोष बंग याला अटक करताच चौकशीदरम्यान प्रकृती खालावली, म्हणून त्याला परतवाडा शहरातील एका खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले. संपूर्ण रात्र तिथे काढल्यावर गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. संतोष बंग याला भेटण्यासाठी अचलपूर नगरपालिकेचे अधिकारी, नगरसेवक, पदाधिकारी आल्याने गर्दी झाली होती.
घरात आढळली एक लाखाची रोकड
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी संतोष बंग याच्या घराची झडती घेतली असता, एक लक्ष रुपयांची रोकड आढळून आली. ती त्याला सुपर कामावर देण्यात आली असून, त्याचा हिशोब देण्याचे सांगण्यात आल्याचे एसीबीचे पोलीस उपअधिक्षक गजानन पडघन यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले. त्याच्या पूर्ण मालमत्तेची चौकशी होणार असून, सदर रकमेत कुणाकुणाचा हिस्सा होता, याचाही तपास एसीबीचे अधिकारी करीत आहे.