मुळाक्षरांपासून गणितीय सूत्रांचे ज्ञान चारोळीतून : यवतमाळच्या शिक्षकाचा अभिनव प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 18:03 IST2017-12-18T18:02:26+5:302017-12-18T18:03:32+5:30
विद्यार्थी लेखन व वाचन कौशल्यात प्रगत व्हावा, यासाठी अनेक शिक्षक आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक महादेव निमकर हे चारोळ्यांचा माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत.

मुळाक्षरांपासून गणितीय सूत्रांचे ज्ञान चारोळीतून : यवतमाळच्या शिक्षकाचा अभिनव प्रयोग
- वीरेंद्रकुमार जोगी
अमरावती : विद्यार्थी लेखन व वाचन कौशल्यात प्रगत व्हावा, यासाठी अनेक शिक्षक आपल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करीत आहेत. यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर प्राथमिक शाळेचे प्रयोगशील शिक्षक महादेव निमकर हे चारोळ्यांचा माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देत आहेत.
महादेव निमकर हे चारोळीच्या माध्यमातून मुळाक्षरे, अंक, इंग्रजी अल्फाबेट, इंग्रजी अंक, गणितीय सूत्र, भौमितीय आकृत्या व परिपाठाचे सूत्रसंचालनदेखील चारोळ्यांच्या माध्यमातून करतात. स्वत:च्या शैलीची माहिती देताना ते मुळाक्षरांचे ज्ञान देण्यासाठी ‘अ’अक्षराचे ज्ञान करून देण्यासाठी पाटावर बस, घे थोडा रस, अ पासून होतो, अननस अननस’ अशा चारोळीचा उपयोग करतात. या माध्यमातून ‘अ अननसाचा’ असे समजवितात. सोबतच अननसापासून रस निघतो. रस पिताना तो आरामात, मजा घेत प्यावा, असेही ते सांगतात. यामुळे एका चारोळीतून अनेक गोष्टी विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न त्यांचा असतो.
इंग्रजीचे अंक शिकविताना ‘मोफत म्हणजे फ्र ी, झाड म्हणजे ट्री, इंग्रजीत तीनला म्हणतात थ्री’ या चारोळीचा वापर करतात. यातून इंग्रजीच्या दोन शब्दांसह अंकांचे ज्ञानही मिळते. गणितीय सूत्र शिकविताना ‘किल्ला म्हणजे दुर्ग, आईच्या पायात स्वर्ग, चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाजूचा वर्ग’ अशी चारोळी वापरतात. त्यांनी तयार केलेल्या चारोळ्यांच्या ‘चारोळीतून गुणवत्तेकडे’ पुस्तक प्रकाशित केले आहे. शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांना त्यांनी आपल्या पुस्तकाची पहिली प्रती भेट केली असून, त्यांनी त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केल्याचे निमकर यांनी सांगितले.
राज्यस्तरीय वारीसाठी निवड
महाराष्ट्र राज्य विद्या परिषद पुणे यांच्यावतीने दरवर्षी शिक्षणाची वारीचे आयोजन करण्यात येते. ‘अभिजात भाषा चारोळीतून गुणवत्तेकडे’ या त्यांच्या विषयाची निवड करण्यात आली आहे. अमरावती विभागातून राज्यस्तरीय ‘शिक्षण वारी’करिता निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक भेट देणारे शिक्षक करीत आहेत.
कविता व चारोळी लिखाणाची आवड असल्याने आपल्या या गुणांचा वापर विद्यार्थ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी व्हावा, या विचारांतून या चारोळ्यांची रचना केली. मुख्याध्यापकासह सहकारी शिक्षकांनी उत्साहवर्धन केल्यानेच हा प्रयोग यशस्वी करता आला.
- महादेव निमकर,
चारोळ्यांतून धडे देणारे शिक्षक