पॉस मशिनद्वारे मिळणार केरोसिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:04 IST2018-09-26T23:04:26+5:302018-09-26T23:04:54+5:30
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित केरोसिन शिधापत्रिकाधारकांना देण्याची तरतूद आहे. यासाठी राज्यभरात ६० हजारावर किरकोळ केरोसिन परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. यामधून गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले असून अनुदानित केरोसिन पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

पॉस मशिनद्वारे मिळणार केरोसिन
अनेकश्वर मेश्राम ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बल्लारपूर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अनुदानित केरोसिन शिधापत्रिकाधारकांना देण्याची तरतूद आहे. यासाठी राज्यभरात ६० हजारावर किरकोळ केरोसिन परवानाधारकांची नियुक्ती करण्यात आली. यामधून गॅस जोडणी शिधापत्रिकाधारकांना वगळण्यात आले असून अनुदानित केरोसिन पॉस मशिनच्या माध्यमातून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून केरोसिन वितरणासाठी पॉस अर्थात पार्इंट आॅफ सेल डिवाइस यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आधार क्रमांक जोडलेल्या शिधापत्रिकाधारकांना केरोसिन मिळणार आहे. केरोसिन दुकानातील ई-पॉस मशिनद्वारे कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याचे आधार अॅथेलीकेशन झाले असल्यास केरोसिन मिळणार आहे. ई-पॉस मशिनवर शिधापत्रिकेची माहिती उपलब्ध नसल्यास शिधापत्रिका, आधार नोंदणी प्रत, शासकीय छायांकित ओळखपत्राच्या माध्यमातून केरोसिन उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. ज्या केरोसिन विक्रेत्याकडे ई-पॉस यंत्रणा बसविण्यात आली नाही. अशा विक्रेत्यांनी शिधापत्रिका धारकांकडून आधार क्रमांक, केरोसिन विक्रीबाबत पावतीवर लाभार्थ्यांचे नाव व शिधापत्रिकेचा क्रमांक नोंद करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या पावतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी, त्याचबरोबर घोषणापत्र देखील केरोसिन विकत घेताना द्यावे लागणार आहे. गॅस जोडणी असल्यास शिधापत्रिकाधारकांना अनुदानित दराचे केरोसिन दिल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अन्वये दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. बिगर गॅस जोडणी धारकांनाच केरोसिन मिळावे, हा यामागील हेतू आहे.
यामुळे केरोसिन विक्रेते चांगलेच धास्तावले असून केरोसिन विक्रीची माहिती अद्यावत कशी ठेवावी, या चिंतेत सापडले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्न धान्य वितरण अधिकारी अथवा तहसीलकडे शिधापत्रिकेसोबत गॅस जोडणीची अधिकृत आकडेवारी नसल्याने ई-पॉस मशिनद्वारे विक्री करण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.
केरोसिन घेताना द्यावे लागेल हमीपत्र
ज्या शिधापत्रिका धारकाला केरोसिन विकत घ्यावे लागणार, अशा ग्राहकाला मी शिधापत्रिकाधारक असून माझ्या अथवा कुटुंबातील सदस्याच्या नावाने गॅस जोडणी नाही. जोडणी असल्यास अनुदानित केरोसिनचा लाभ घेणार नाही. असे हमीपत्र तहसीलदार यांचे समक्ष सादर करावे लागणार आहे. यामुळे ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागणार असून वेळीच केरोसिन गरजूंच्या कामी कसे पडणार, याची काळजी शासनाला घ्यावी लागणार आहे.
ग्राहक व विक्रेत्यात संघर्षाचे चिन्ह
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना उपलब्धतेनुसार वेळीच केरोसिन मिळत होते. आता मात्र ई-पॉस मशिनचा फतवा निघाला. हमीपत्रासह अन्य जाचक अटी विक्रेता व ग्राहकांवर नव्याने लादण्यात आल्या. ग्रामीण भागात आजही इंधनासाठी केरोसिनचा वापर केला जातो. सहज मिळणारे केरोसिन अटीच्या पूर्ततेनंतर मिळणार असल्याने विक्रेता व ग्राहक यांच्यात संघर्ष निर्माण करण्याचे चिन्ह दिसून येणारा निर्णय ठरणार आहे.