कन्हान वाळू तस्करी फोफावली

By Admin | Updated: March 27, 2017 00:08 IST2017-03-27T00:08:13+5:302017-03-27T00:08:13+5:30

नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. रॉयल्टी दोन ब्रास अन् १२ ब्रास वाळू वाहतुकीने कहर केला आहे.

Kanhan sand smuggling | कन्हान वाळू तस्करी फोफावली

कन्हान वाळू तस्करी फोफावली

कोट्यवधींचा महसूल बुडीत : रॉयल्टी दोन ब्रासची अन् वाहतूक १२ ब्रास
अमरावती : नागपूर जिल्ह्यातील कन्हान नदी पात्रातून अमरावतीत मोठ्या प्रमाणात वाळूची तस्करी केली जात आहे. रॉयल्टी दोन ब्रास अन् १२ ब्रास वाळू वाहतुकीने कहर केला आहे. या वाळू तस्करीतून शासन तिजोरीला फटका बसत आहे. यात पोलीस, महसूल व आरटीओंची मिलिभगत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतुकीचे प्रमुख केंद्र हे वलगाव मार्गावरील ट्रान्सपोर्टनगर तर नागपूर महामार्गवरील नवसारी स्टॉप हे आहे. वाळू वाहतुकीसाठी तस्कर रात्रीचा विशेष वापर करतात. दोन ब्रासची रॉयल्टी जमा करून १२ ब्रासपर्यत वाळू आणली जात आहे. त्यामुळे एका वाहनातून कन्हान वाळू तस्करीपोटी शासनाचा सुमारे ५० ते ६० हजार रुपयांचा महसूल बुडत आहे. नियमबाह्य वाळू वाहतुकीला लगाम असताना दरदिवसाला ४० ते ५० ट्रक चालतात कसे? हा संशोधनाचा विषय आहे. कन्हान वाळू ही अमरावतीत सावनेर- खापा नदी पात्रातून आणली जात आहे. दोन ब्रास वाळूच्या रॉयल्टीचे ६५०० रुपये शुल्क दिले जाते. खरे तर १२ ब्रास वाळू वाहतुकीसाठी ३८ हजार ८२० रुपये इतकी रॉयल्टीपोटी शुल्क शासन तिजोरीत जमा करणे अपेक्षित आहे. मात्र अवघ्या ६५०० रुपयात १२ ब्रास वाळू आणून ती ४५ ते ५० हजार रुपयांत विकली जात आहे. कन्हान वाळू तस्करीचे पायमुळे खोलवर रुजली आहेत. वर्धा, नागपूर व अमरावतीचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यात सामील आहे. कन्हान वाळूची नियमबाह्य वाहतूक वजा तस्करी बिनदिक्कत सुरू राहावी, यासाठी आदिल व लाला हे दोन व्यक्ती आरटीओ, महसूल व पोलिसांना ‘मॅनेज’ करीत असल्याची माहिती आहे. अमरावती येथून दरदिवसाला ४० ते ५० ट्रक कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतूक करतात. सावनेर, कळमेश्वर, कारंजा, तळेगाव, तिवसा, अमरावती व भातकुली असा तहसील हद्दीचा प्रवास करून कन्हान वाळूची शहरात तस्करी केली जाते. गत काही महिन्यांपासून कन्हान वाळू तस्करी, नियमबाह्य वाहतूक फोफावली आहे. शहराच्या विविध ठिकाणी कन्हान वाळू साठवून ठेवली जात असताना या अड्ड्यांवर कारवाई केव्हा करणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. कन्हान नदी पात्रातून नियमबाह्य वाळू येत असून लाखोंचा महसूल बुडत आहे. वाळू तस्करीतून दलाल, वाळू विक्रेते गब्बर झाले आहेत. हल्ली शहरात बांधकामासाठी सर्रासपणे कन्हान वाळू वापरली जात आहे. मात्र नियमबाह्य वाळू आणली जात असल्याने शासकीय वाळूची मागणी ओसरली आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात कन्हान वाळू वाहतूक रोकणे हे पोलीस, महसूल व आरटीओसमोर आव्हान ठरत आहे.

रात्रीलाच वाळू वाहतूक का ?
कन्हान नदी पात्रातून वाळू वाहतूक ही रात्रीलाच का केली जाते, यामागे बरेच काही दडले आहे. रात्री ९ ते सकाळी ६ वाजेदरम्यान सुसाट धावणारे १२ चाकांचे ट्रक दिवसा कोठे ठेवले जातात? हादेखील संशोधनाचा विषय आहे. कन्हान वाळूची विक्री करणारे ठराविक एजन्ट असून ते दिवस उजेडण्यापूर्वीच बांधकामस्थळी पोहोचून देतात. कन्हान वाळू तस्करीतून शासन तिजोरीत कोट्यवधीचा फटका बसत आहे. मात्र या व्यवसायातून काही जण गब्बर झाले आहे.

Web Title: Kanhan sand smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.