जनआरोग्य योजनेचे कार्ड 'ईएसआयसी'मध्येही चालणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:04 IST2025-04-11T12:04:11+5:302025-04-11T12:04:31+5:30
सार्वजनिक आरोग्यसेवेचा होणार विस्तार; अनेकांना मिळणार लाभ

Jan Arogya Yojana card will also work in ESIC
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून ७ एप्रिल रोजी राज्यातील कामगार विमा योजना (ईएसआयसी) अंतर्गत कार्यरत रुग्णालयांमध्ये महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता केवळ नोकरी करणाऱ्या कामगारांपुरतीच मर्यादित असलेली ईएसआयसी रुग्णालये सर्वसामान्य गरीब जनतेसाठीदेखील खुली झाली आहेत.
नव्या व्यवस्थेमुळे जनआरोग्य योजनेच्या कार्डधारकांना १३५६ प्रकारच्या गंभीर आजारांवर मोफत उपचार, शस्त्रक्रिया व औषधोपचार मिळणार आहेत. प्रारंभी काही ईएसआयसी रुग्णालयात स्त्री रुग्णांसाठी स्वतंत्र सेवा उपलब्ध करून दिली जाणार असून, त्यानंतर सर्वांनाच ही सुविधा मिळणार असल्याची माहिती आहे.
प्रारंभी स्त्री रुग्णांना प्राधान्य
या योजनेंतर्गत प्रारंभिक टप्प्यात स्त्री रुग्णांना प्राधान्य दिले जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने अन्य रुग्णांनाही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य कार्ड आवश्यक
महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा कार्ड हे योजनेचा घेण्यासाठी आवश्यक आहे. या योजनेंतर्गत, वैध रेशन कार्ड, (पिवळे, केसरी, अंत्योदय, अन्नपूर्णा) आणि छायाचित्रासह ओळखपत्र (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना) असणे आवश्यक आहे.
१३५६ आजारांवर मोफत उपचार
राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आरोग्य सुविधा आता अधिक सुलभ आणि सामर्थ्यवान होणार आहेत. गंभीर आजारांवर मोफत उपचारांसह हृदयविकार, कॅन्सर, मेंदुविकार, डायलिसिस, सर्जरी, प्रसूती, शस्त्रक्रियादेखील करून घेता येणार आहेत. त्यामुळे उपेक्षित घटकाला मोठा दिलासा मिळणार आहे. यामध्ये १ हजार ३५६ आजारांवर या योजनेंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
गरिबांचा वेळ, पैसा वाचणार
खासगी रुग्णालयांपेक्षा कमी गर्दी, अधिक सुविधा आणि दर्जेदार आरोग्यसेवा गोरगरिबांना थेट मिळणार आहेत. यामुळे गोरगरीब रुग्णांचा वेळ आणि पैसाही वाचणार आहे
जागतिक आरोग्य दिनी घोषणा
जागतिक आरोग्य दिनानिमित्त ७ एप्रिल रोजी शासनातर्फे ही योजना राबविण्याबाबची घोषणा करण्यात आली आहे.
कामगार रुग्णालय आता सर्वांसाठी खुले
कर्मचारी राज्य विमा निगमच्या वैद्यकीय लाभ परिषदेने या योजनेत सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे कामगार विमा रुग्णालय सर्वच घटकांना सेवा पुरविणार आहेत. दरवर्षी पात्र कुटुंबाला पाच लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्य विमा सेवा हे उद्दिष्ट आहे.
"एकीकृत आयुष्मान, प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेतून राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे असंख्य गरीब घटकांना आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत."
- डॉ. अंकिता मटाले, जिल्हा समन्वयक