गाव तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2021 03:32 PM2021-09-20T15:32:53+5:302021-09-20T15:36:52+5:30

पावसाळ्यात गाव तलावाच्या आउटलेटमधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत होता. याबाबाबत ग्रामस्थांनी ठराव घेऊन तो संबंधित विभागांना दिला होता. मात्र, मात्र प्रशासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने वैतागलेल्या ग्रामस्थांनी अखेर जलसमाधी आंदोलन केले.

Jalasamadhi movement to change the direction of water of village lake | गाव तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

गाव तलावाच्या पाण्याची दिशा बदलवण्यासाठी ग्रामस्थांचे जलसमाधी आंदोलन

Next
ठळक मुद्देरेस्क्यू टीमच्या माध्यमातून महिलांना काढले पाण्याच्या बाहेर

अमरावती : दर्यापूर तालुक्यातील लोतवाडा येथे असलेल्या गाव तलावाचे पाणी नागरी वस्तीत सतत शिरत असल्याने येथील नागरिकांनी तथा ग्रामपंचायतीच्या वतीने जलसंधारण विभागाला अनेक वेळा निवेदने तक्रारी दिल्या. मात्र, ढिम्म प्रशासन कोणतीही कारवाई करायला तयार नसल्याने अखेर सरपंच पंचशीलाभीमराव कुराडे यांच्या नेतृत्वात तथा सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांच्या मार्गदर्शनात लोटवाडा येथे गाव तलावतच जलसमाधी आंदोलन करण्यात आले. 

पावसाळ्याच्या दिवसात गाव तलावाच्या आउटलेटमधून पाण्याचा मोठा प्रवाह लोटवाडा गावातील नागरी वस्तीत शिरत असल्याने येथील नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत होते. ग्रामपंचायतच्या वतीने सुद्धा या संबंधात ठराव घेऊन तो जलसंधारण विभागाला, महसूल विभागाला देण्यात आला होता. मात्र, प्रशासन सुस्तपणे काम करत असल्याने अखेर नागरिकांच्या वतीने शनिवारी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात एकूण ९ नागरिकांनी सहभाग घेतला होता. 

येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल बच्छाव यांच्या नेतृत्वात पोलिसांचा ताफा या गाव तलावाजवळ उपस्थित झाला होता. असे असतानाही प्रशासनाची नजर चुकवून आंदोलनकर्ते पहाटेच्या अंधारातच गाव तलावातील जागेवर पोहोचले, यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली. तहसीलदार योगेश देशमुख, ठाणेदार अमोल बच्छाव, जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वानखडे यासह जिल्हाधिकारी कार्यालयातून रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी पोहोचले.  गावकरी आणि नागरिक या गाव तलावाजवळ मोठ्या संख्येने पोहोचले होते. आंदोलनकर्त्यांनी पाण्यात आपला ठिय्या मांडला व जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत पाण्याबाहेर न येण्याचे प्रशासनाला ठामपणे सांगितले. यासह आमची मागणी मान्य न झाल्यास महिलांसह खोल पाण्यामध्ये जलसमाधी घेणार असल्याचे जाहीर करताच प्रशासन अलर्ट झाले. 

आंदोलनकर्त्यांनी मागणी पूर्ण झाल्याचे लेखी आश्वासन देईपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे सांगितल्याने प्रशासनाने जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना आश्वासनाची लेखी पत्र देण्याची विनंती केली. यावर कार्यकारी अभियंता जलसंधारण विभाग यांचे लेखी पत्र प्राप्त झाल्यानंतरच आंदोलन समाप्त करण्यात आले. या पत्रानुसार लोटवाडा गावालगत असलेल्या गाव तलावाच्या आउटलेटची दिशा बदलून तथा गावालगत असलेल्या भागाला बुजवून सुरक्षित भिंत उभारण्याचे लेखी अभिवचन देण्यात आले. यावेळी रेस्क्यू टीमच्या माध्यमातून बोटीने गाव तलावाच्या मधोमध आंदोलन करत असलेल्या महिलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या आंदोलनात लोटवाडा सरपंच पंचशीला कुऱ्हाडे, कोकिळा राजीव रक्षे, सुमित्रा सुभाष रायबोले , सुभाष रायबोले, रमाबाई रायबोले, पंचफुला रायबोले, यांचा सहभाग आंदोलनात होता. तर प्रशांत वानखडे उपविभागीय जलसंधारण अधिकारी, संदीप कोकडे जलसंधारण अधिकारी, मयूर कराळे, गजानन वडतकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार गाडेकर, ठाणेदार अमोल बच्छाव, पीएसआय वसंत शिंदे, सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे आदी उपस्थित होते. 

Web Title: Jalasamadhi movement to change the direction of water of village lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.