'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 13:11 IST2025-10-01T13:10:00+5:302025-10-01T13:11:12+5:30
Amravati : वैयक्तिक संबंध, मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमासंदर्भात आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे.

'It doesn't happen that people give up their ideology because of friendship..' Controversy over the name of the judge's mother on the Sangh's invitation card!
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अमरावती महानगराच्या वतीने रविवार, ५ ऑक्टोबरला विजयादशमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची निमंत्रण पत्रिका दारोदारी वाटप केली जात असून, संघाची शताब्दी वर्षपूर्ती साजरी केली जाणार आहे. या कार्यक्रमाला सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या प्रमुख अतिथी म्हणून असणार आहेत. मात्र, डॉ. कमलताई गवई यांचे निमंत्रण पत्रिकेवर नाव असल्याने वाद, चर्चा प्रसार माध्यमांसह सोशल मीडियावर जोरात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला कमलताई जाणार की नाहीत, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. दरम्यान, त्यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही, हे विशेषा अमरावतीचे गवई कुटुंब हे आंबेडकरी विचारसरणीचे असल्याचे सर्वश्रुत आहे.
रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी विचारसरणीवरच रा. सु. गवई यांचे राजकीय, सामाजिक कार्य चालले. तोच वारसा पुढे कमलताई गवई, डॉ. राजेंद्र गवई यांनी चालविला आहे. मात्र, संघाच्या उत्सव सोहळ्यात कमलताई यांना निमंत्रण आल्याने याला वेगवेगळे कंगोरे आले आहेत. याविषयी उलटसुलट चर्चा होत आहे. खरे तर तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर हस्तलिखित एक पत्र भूमिकासंदर्भात व्हायरल झाले, ते कमलताईनी लिहिले नाही, ही बाब आता स्पष्ट झाली आहे. कमलताईनी संघाचे निमंत्रण स्वीकारले होते, अशी माहिती आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. आता तर संघाची निमंत्रण पत्रिका अमरावतीत अनेक ठिकाणी वाटप होत आहे. त्यामुळे कमलताई या कार्यक्रमाला जातात की नाही? हे रविवारी स्पष्ट होईल.
आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल: डॉ. राजेंद्र गवई
वैयक्तिक संबंध, मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही. त्यामुळे संघाच्या कार्यक्रमासंदर्भात आई जो निर्णय घेईल तो मान्य असेल, अशी स्पष्ट भूमिका रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी घेतली आहे. दिवंगत रा. सु. गवई यांचे संबंध माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, गंगाधरपंत फडणवीस यांच्याशी होते. पण, कधीही भूमिका, विचारसरणी बदलली नाही. तोच वसा आणि वारसा आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत. आई कमलताई यांच्या निर्णयाशी सुसंगत राहू, असे डॉ. गवई म्हणाले.