पशुधन संवर्धनासाठी विम्याचे संरक्षण
By Admin | Updated: March 27, 2017 00:05 IST2017-03-27T00:05:19+5:302017-03-27T00:05:19+5:30
दुधाळ जनावरांच्या माध्यमातून उत्तम व गुणकारी दूध मिळते. राज्यातील पशुधनाचे संगोपण व संवर्धन करण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे विम्याचे संरक्षण देण्यात येते.

पशुधन संवर्धनासाठी विम्याचे संरक्षण
पालकमंत्री प्रवीण पोटे : पशूप्रदर्शनी, शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन
अमरावती : दुधाळ जनावरांच्या माध्यमातून उत्तम व गुणकारी दूध मिळते. राज्यातील पशुधनाचे संगोपण व संवर्धन करण्यासाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागाव्दारे विम्याचे संरक्षण देण्यात येते. शेतकऱ्यांनी व जनावरांच्या मालकांनी शासनाच्या या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.
पशुसंवर्धन विभाग जि.प. व पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वाढोणा (रामनाथ) येथे आयोजित पशू प्रदर्शनी व शेतकरी मेळाव्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आ.वीरेंद्र जगताप, जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाणे, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी, जि.प.सदस्य रवि मुंदे, अनिता अडमाते, जयश्री कोहचळे, पंचायत समिती सभापती बाळासाहेब इंगळे, उपसभापती विजय आखरे तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके, तहसीलदार बी.व्ही. वाहुरवाघ, गटविकास अधिकारी सूरज गोहाड, पंचायत समितीचे सदस्य, पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले, दुधाळ जनावरांच्या खरेदीसाठी पशुसंवर्धन विभागाव्दारे कर्ज पुरविले जाते. जनावरांच्या संगोपण व संवर्धनासाठी जनावरांच्या मालकांना जनावरांचा विमा काढून दिला जातो. जनावर आजारी किंवा मृत्यू पावल्यास वेळोवेळी विभागाव्दारे मदत करण्यात येते. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपल्या जनावरांचा विमा काढावा. उन्हाळ्यात जनावरांना खाण्यासाठी चारा नसतो, जनावरांना चाऱ्याची कमतरता भासू नये म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतात किमान पाच झाडे लावावीत. या माध्यमातून जनावरांना चारा उपलब्ध होईल व पयार्याने दूध उत्पादन क्षमता वाढेल.
अधिक जीवनमान असलेल्या झाडांच्या लागवडीमुळे जमिनीची धूप कमी होऊन पडणाऱ्या पाऊसाचे पाणी जमिनीत टिकून राहते. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जांभूळ, चिंच, फणस, मोह, सीताफळ यासारख्या झाडे लावून उत्पन्न घ्यावे. प्रत्येकाने आपले गाव स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून किमान पाच झाडे लावावीत. गावातील शेणखताचे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करावे. आपले गाव हागणदारी मुक्त करण्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाने शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रवीण पोटे यांनी केले.
पशु प्रदर्शनीमध्ये पंकज कांताप्रसाद मिश्रा यांच्या गायीला सर्वोत्कृष्ट गाय चॅम्पियन आॅफ चॅम्पियन म्हणून दहा हजारांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.
पशु प्रदर्शनीमध्ये संकरीत गायी, कालवडी गायी, संकरीत नर, वळू, देशी गाय, देशी वळू, बैल जोडी, सुधारित जातीच्या म्हशी, देशी म्हशी, रेडा, शेळी-मेंढी, अश्र्व वर्ग, देशी-विदेशी कोंबडा या गटातील उत्कृष्ट पशुपक्षांसाठी प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांकाच्या बक्षिसांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जि.प.सदस्य रवि मुंदे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पशुधन पर्यवेक्षक सुनील राऊत यांनी केले. मेळाव्याला तालुक्यातील व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)