वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ
By गणेश वासनिक | Updated: June 24, 2023 22:48 IST2023-06-24T22:45:07+5:302023-06-24T22:48:44+5:30
उपवनसंरक्षकांचे पत्र, वनसर्व्हेअर चमू पोहोचला घटनास्थळी, खांब उभारणीतही गौडबंगाल

वनसीमांचे सिमेंट खांब उभारणीची तपासणी, उपवनसंरक्षकाच्या पत्राने खळबळ
अमरावती : केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून जंगलाची वनसीमा दर्शविण्यासाठी सन २०२२-२३ या वर्षात सिमेंटचे पोल उभारण्यात आले. त्याकरिता निधीदेखील खर्च झाला असून आता हे सिमेंटचे खांब खरेच उभारण्यात आले का, याची तपासणी सुरू झाली आहे. सिमेंट खांब उभारणीवरून वरूड आरएफओंना टार्गेट करण्यात आले आहे. उपवनसंरक्षक चंद्रसेकरन बाला यांच्या २० जून रोजीच्या पत्राने एकच खळबळ उडाली आहे.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात बसविण्यात आलेल्या वनहद्द सीमा खांबांची तपासणी १०० टक्के करण्यात येत असून, त्याबाबतचा अहवाल नागपूर येथील अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संधारण) यांच्याकडे पाठवावा लागणार आहे. जंगलात वनहद्द सीमेवर सिमेंटचे खांब लावण्यासाठी वनपरिक्षेत्राधिकारी यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, बहुतांश आरएफओंनी हे सिमेंटचे खांब कागदाेपत्री उभारल्याचे वास्तव आहे. त्यामुळे उपवनसंरक्षक चंद्रसेकरन बाला यांनी अमरावतीवनविभागाअंतर्गत सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात परतवाडा, मोशी आणि वरूड या वनपरिक्षेत वनक्षेत्राचे सीमेवरील सिमेंट खांब तपासणी वेगाने सुरू केली आहे. त्याकरिता शनिवारी वरूड आरएफओ क्षेत्रात वनसर्व्हेक्षक के. पी. राठोड, डी. बी. महाजन हे तळ ठोकून आहेत. वरूड आरएफओंनी किती वनांच्या सीमेवर सिमेंट खांबाची उभारणी केली, याचे वास्तव घटनास्थळी जाऊन ही चमू शोध घेत आहे.
वरूड वनपरिक्षेत्रातील सिमेंट खांब कामांवर संशय
वरूड वनपरिक्षेत्रात वनहद्दीच्या सीमेवर सिमेंटच्या खांब उभारणीबाबत वरिष्ठांना संशय असल्यामुळे डीएफओ बाला यांनी तसे पत्र निर्गमित करून वनसर्व्हेक्षकांना तपासणीसाठी पाठविल्याची माहिती आहे. वनसर्व्हेक्षकांचा चमू घटनास्थळी पोहाेचताच संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे किती खांब लागले, किती कागदाेपत्रीच याचा लेखाजोखा सादर होणार आहे. तसेच गुगल मॅपिंगद्वारे वनपरिक्षेत्र, वाळ, नियतक्षेत्र, वनखंड क्रमांक नमूद करून वर्गवारी केली जाणार आहे.