लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 06:00 IST2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:20+5:30
दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले.

लॉ कॉलेजच्या विद्यार्थिनीला अमानुष मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधी महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला भावी वकील विद्यार्थ्याने लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत तिचा विनयभंग केला. ही धक्कादायक घटना बुधवारी मोर्शी रोडवरील डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडली. या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अजिंक्य चित्तरंजन सिनकर (२४, रा. यवतमाळ, ह.मु. फरशी स्टॉप) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पोलीस सूत्रानुसार, विधी महाविद्यालयात शिकणाऱ्या अजिंक्य सिनकरची २२ वर्षीय विद्यार्थिनीसोबत मैत्री होती. बुधवारी महाविद्यालयात विद्यार्थी आले होते. दररोजप्रमाणे वर्ग सुरू झाले. यादरम्यान महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये काही कारणांवरून अजिंक्य व सदर मुलीचा वाद सुरु झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर अजिंक्यने तिला थापडा व बुक्क्यांनी मारहाण करणे सुरु केले. या प्रकाराकडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले गेले. मारहाणीनंतर अजिंक्य तेथून निघून गेला. जमिनीवर कोसळलेल्या त्या विद्यार्थिनीला अन्य विद्यार्थ्यांनी मदतीचा हात दिला. या घटनेची माहिती प्राचार्य व प्राध्यापकांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कॅम्पसकडे धाव घेतली. विधी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रणय मालवीय व स्त्री हिंसाचार प्रतिबंधक समितीच्या अध्यक्ष भाग्यश्री देशपांडे यांनी त्या विद्यार्थिनीला तात्काळ डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात उपचाराकरिता नेले. घटनेची माहिती झाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात विद्यार्थिनीचे बयाण नोंदविले. त्यावरून अजिंक्यविरुद्ध भादंविच्या कलम २९४, ३५४, ३२३ अन्वये गुन्हा नोंदविला.
वचक नाही; विद्यार्थी असुरक्षित
श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विधी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान दिले जाते. या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी वकील तसेच नामांकित न्यायाधीशसुद्धा झाले आहेत. तथापि प्राध्यापकांचा आता विद्यार्थ्यांवर वचक नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वीही महाविद्यालय परिसरात मारामारीच्या आणि शस्त्र उगारण्याच्या घटना घडल्या आहेत. श्री शिवाजी शिक्षण संस्थेची मान खाली जावी, अशी बुधवारची घटना आहे.
मुलीचे बयाण नोंदविण्यात आले. त्यानुसार आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध विनयभंग व मारहाणीच्या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त
जखमी मुलीला उपचारासाठी पीडीएमसीत दाखल केले आहे. पोलिसांनी बयाण नोंदविले व कारवाई केली. समितीच्या चौकशीनंतर महाविद्यालय प्रशासनाकडून पुढील कारवाई होईल.
- प्रणय मालवीय,
प्राचार्य