बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग
By प्रदीप भाकरे | Updated: November 3, 2023 17:46 IST2023-11-03T17:46:07+5:302023-11-03T17:46:55+5:30
लोणी पोलिसांत गुन्हा

बलात्कारातून अल्पवयीन मुलीला गर्भधारणा; डफरिनमध्ये फुटले बिंग
अमरावती : लग्नाचे आमिष देऊन एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला. त्यातून ती आठ महिन्यांची गर्भवती राहिली. २६ ऑक्टोबरपूर्वी तो प्रकार घडला. याप्रकरणी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लोणी पोलिसांनी एका २७ वर्षीय आरोपीविरुद्ध २ नोव्हेंबर रोजी बलात्कार व पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. प्रवीण किशोर खडसे (२७) असे आरोपीचे नाव आहे.
अल्पवयीन पीडिता ही बलात्कारातून गर्भवती राहिली. दरम्यान, आठ महिन्यांची गर्भवती झाल्याने तिला त्रास होऊ लागला. त्यामुळे २७ ऑक्टोबर रोजी तिला अमरावती जिल्हा स्त्रीरुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तिची तपासणी केली असता ती अल्पवयीन असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यामुळे त्याबाबत गाडगेनगर पोलिसांसह बाल संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यावेळी गाडगेनगर पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्या अल्पवयीन पीडिताचे बयाण नोंदविले.
आरोपी प्रवीण खडसे याने आपल्याला लग्नाचे आमिष दिले. त्याने अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे आपणास गर्भधारणा झाल्याचे बयाण तिने दिले. त्यामुळे गाडगेनगर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला. मात्र, घटनास्थळ लोणी पोलिसांच्या हद्दीत येत असल्याने तो गुन्हा लोणीकडे वर्ग करण्यात आला.