प्रतिकारशक्तीचा शरीरावर हल्ला; हात-पाय वाकतात, हा कसला वात ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:51 IST2025-02-10T12:51:37+5:302025-02-10T12:51:59+5:30
Amravati : आजारात सिस्टेमिक ल्युपस एरिथेमोटसचे प्रमाण चिंताजनक

Immune system attacks the body; arms and legs bend, what kind of Vata is this?
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या अवयवांवर हल्ला चढवितात, तेव्हा ल्युपस विकाराची लागण होते. यालाच एसएलई असे वैद्यकीय भाषेत संबोधले जाते. हा एक वातरोग असून, पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त आढळतो. दहा रुग्णांपैकी नऊ रुग्ण महिला असतात. प्रजननक्षम महिलांसह लहान वयातील मुलींमध्ये ल्युपस विकार आढळतो. चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचे लाल चट्टे येणे सुरू होते, हे या विकाराचे प्रमुख लक्षण आहे.
ल्युपस या वातरोगाबाबत आजही पाहिजे त्या प्रमाणात समाजात जागृती नाही. या विकाराची लक्षणे ही सर्वसामान्यांप्रमाणेच असल्याने अनेकदा याकडे दुर्लक्ष केले जाते. ल्युपस या विकाराचे एक लाख व्यक्तींमध्ये ३ ते ४ रुग्ण आढळतात. या विकारात एकाचवेळी शरीरातील अन्य अवयवांवर हल्ला होत असतो. ल्युपस विकारामुळे महिलांमध्ये गर्भधारणा होण्यास अडचण निर्माण होते.
ल्युपसची कोणतीही दोन प्रकरणे अगदी सारखी नसतात. चिन्हे आणि लक्षणे अचानक येऊ शकतात किंवा हळूहळू विकसित होऊ शकतात. काही लोक ल्युपस विकसित होण्याच्या प्रवृत्तीसह जन्माला येतात, जो संसर्ग, विशिष्ट औषधे वा अगदी सूर्यप्रकाशामुळे देखील होऊ शकतो. ल्युपसवर इलाज नसला तरी उपचारांमुळे लक्षणे नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते.
आपल्याच सैन्याचा आपल्यावर वार
आजारापासून दूर ठेवण्यास रोगप्रतिकारशक्ती फायदेशीर ठरते. एसएलईमध्ये रोगप्रतिकारक पांढऱ्या पेशीच परिणाम करतात.
पांढऱ्या पेशी म्हणजे शरीरातील सैन्य
रक्तातील पांढऱ्या पेशी रोगप्रतिकारक शक्तीचे काम करतात. त्यामुळे पांढऱ्या पेशीला शरीरातील सैन्य असे संबोधल्या जात असते. त्या महत्त्वाच्या असतात.
हात-पाय वाकतात आणि अंगाला येतो ताप
एसएलईमध्ये अनेकांची लक्षणे वेगवेगळी असतात. कुणाला ताप, सांधेदुखी, सूज, हात-पाय वाकण्याचेही रुग्ण दिसून येतात. त्यामुळे लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेण्याची आवश्यकता आहे
युरिक अॅसिड वाढते, तसेच प्लेटलेटस घटायला लागते
एसएलईमध्ये युरिक अॅसिड वाढत असते. पांढऱ्या पेशीवर परिणाम होत असल्याने प्लेटलेटस घटत असतात. शरीरातील प्लेटलेटस घटत गेल्याने रुग्णाची प्रकृती खालावत जाते. तसेच, वाताचा त्रासही आणखीच जाणवायला लागतो. म्हणून, वेळीच खबरदारी घेऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.
प्रतिकारशक्ती कमी झाली, तर बळावतोय आजार
आपली रोगप्रतिकारशक्ती कमी झाली, तर एसएलई आजाराचा धोका अधिकच वाढत जातो. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती चांगली असणे आवश्यक आहे.
'एसएलई' कशामुळे ?
शरीराच्या आत आणि बाहेरील घटकांच्या संयोजनामुळे ल्युपस विकसित होतो. यामध्ये हार्मोन्स, अनुवंशिकता आणि पर्यावरणाचा समावेश होतो.
"ल्युपस हा एक वातरोग आहे. अनुवंशिकता, अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरातील पांढऱ्या पेशी इतर अवयवांवर परिणाम करत असतात. परंतु, वेळीच उपचार घेतल्यास हा आजार बरा होऊ शकतो."
- डॉ. दिनेश खरात, अस्थिरोगतज्ज्ञ