आम्ही मॅनेज झालो असतो, तर.. ; ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करावे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 16:47 IST2025-11-03T16:45:38+5:302025-11-03T16:47:39+5:30
Amravati : भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते.

If we had been managed...; Trollers should protest for farmers
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : महाएल्गार आंदोलनामुळेच राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची तारीख घोषित केली. आम्ही कर्जमाफीसाठी प्रामाणिकपणे आंदोलन केले, तरीही ट्रोल करून भाजपकडून बदनाम करण्याचे षडयंत्र रचले जात आहे. त्यामुळे आता ट्रोल करणाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सरकारविरुद्ध आंदोलन करावे. असे असले तरी शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारचे ३० जून, तर १ जुलै २०२६ ही आमची असेल, असा निर्वाणीचा इशारा माजी मंत्री बच्चू कडू यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेतून दिला.
भाजप सरकारमधील काही लोक आम्हाला बदनाम करण्याचा अजेंडा राबवत आहेत. सोशल मीडियावर ट्रोल करून आमच्याविरोधात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न होतोय. पण आम्ही मॅनेज झालो असतो, तर आमच्यावर गुन्हे दाखल झाले असते. मोबाइलवर टीका करण्याऐवजी आंदोलनात उतरले असते, तर शेतकऱ्यांचे भले झाले असते, असा टोला त्यांनी लगावला. मक्याची खरेदी अजून सुरू नाही, सोयाबीनला हमीभाव नाही, दूध उत्पादक संकटात आहेत अशा प्रश्नांवर ट्रोल करणाऱ्यांनी आंदोलन करावे, आम्हीदेखील सहभागी होऊ, असे आव्हान त्यांनी दिले. पत्रकार परिषदेला अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, बल्लू जवंजाळ, वसू महाराज, बंटी रामटेके, संजय देशमुख, आनंद काळे, अजय मसकरे उपस्थित होते.
मला आयुष्यातून उठवण्याचा डाव
- भाजप व त्यांचे सहकारी मला आयुष्यातून उठवण्याचा डाव रचत आहेत. आमच्या आंदोलनाला गालबोट लागले नाही, हेच आमचं यश आहे.
- काही जण बच्चू कडू आंदोलन करण्याच्या लायकीचा राहू नये, अशी परिस्थिती निर्माण करत आहेत, असा आरोप कडू यांनी केला.
- दरम्यान, अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी बच्चू कडू यांच्या संपत्तीची चौकशी करावी, असे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
- याबाबत विचारले असता, 'हवामहल' बघायला या, तेव्हाच कळेल काय खरं आहे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.