लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिका निवडणुकीत भाजप मोठा भाऊ, तर युवा स्वाभिमान पक्ष लहान भाऊ अशी मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. अमरावतीत महापौर हा भाजपचाच होणार असा शब्द मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला असून, तो प्रामाणिकपणे पाळणार आहे, अशी रोखठोक भूमिका युवा स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आमदार रवी राणा यांनी मंगळवारी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली.
आमदार रवी राणा यांच्या मते, भाजप आणि युवा स्वाभिमान पक्ष अमरावती महापालिका निवडणुकीत वेगवेगळे लढत आहे. असे असले तरी ज्या जागेवर भाजप उमेदवार कमकुवत आहे, अशा जागेवर युवा स्वाभिमानचा 'मजबूत' उमेदवार निवडून आणला जाईल. आणि ज्या जागी युवा स्वाभिमानचा उमेदवार कमकुवत आहे, तेथे भाजपच्या 'मजबूत' उमेदवाराला निवडून आणले जाईल, असा भाजप आणि 'वायएसपी'त वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय झाला आहे. कारण अमरावती भाजपच्या कोअर कमिटीने तिकीटवाटपात जो काही गोंधळ केला आहे, यात निष्ठावंत आणि प्रामणिक कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची संतप्त भावना आहे. त्यामुळे भाजपच्या काही निष्ठावंतांना युवा स्वाभिमान पक्षाची उमेदवारी दिली असून, ते त्यांच्या प्रभागात सक्षम उमेदवार म्हणून मैदानात लढत आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात असताना प्रभागात जे काही वास्तविक चित्र समोर येईल त्यानुसार भाजप आणि युवा स्वाभिमान संयुक्तपणे निर्णय घेत 'मजबूत' असलेल्या उमेदवाराला निवडून आणू, असेही आमदार रवी राणा म्हणाले.
ही तर काळ्या दगडावरची रेघ
महापौर हा भारतीय जनता पक्षाचाच होईल, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. हाच निकाल शहरात अपेक्षित आहे. त्याला कोणीही टाळू शकत नाही, असेही आ. रवि राणा म्हणाले. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर मैत्रीपूर्ण लढतीमुळे 'दोस्ती भी पक्की, जीत भी पक्की' हे भाजपच्या नेत्यांना प्रत्यक्षपणे दिसून येईल आणि त्यावर शिक्कामोर्तबही होईल, असा दावा आमदार राणा यांनी केला आहे.
'दोस्ती भी पक्की, जीत भी पक्की'
युवा स्वाभिमान पक्षाचे ३२ उमेदवार अमरावती महापालिका निवडणूक रिंगणात आहेत. भाजपने तिकीट वाटपात केलेल्या गोंधळामुळे भाजपशी मैत्रीपूर्ण लढतीचा निर्णय घेतला आहे. विरोधकांना गारद करणे हा 'वायएसपी'चा अजेंडा असल्याचे आमदार रवी राणा म्हणाले.
Web Summary : Ravi Rana affirms BJP will secure Amravati's mayoral position, a promise made to Fadnavis and Bawankule. Despite friendly contests with Yuva Swabhiman, stronger candidates will be mutually supported, ensuring victory.
Web Summary : रवि राणा ने दावा किया कि अमरावती में महापौर बीजेपी का होगा, फडणवीस और बावनकुले से किया वादा। युवा स्वाभिमान के साथ मैत्रीपूर्ण मुकाबले के बावजूद, मजबूत उम्मीदवार पारस्परिक रूप से समर्थित होंगे, जिससे जीत सुनिश्चित होगी।