जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्यांना पोस्टल बॅलेट अद्यापही अप्राप्तच
By Admin | Updated: May 8, 2014 00:45 IST2014-05-08T00:45:56+5:302014-05-08T00:45:56+5:30
निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 'टपाली मतदानाची सुविधा दिली जाते. त्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारले जातात.

जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्यांना पोस्टल बॅलेट अद्यापही अप्राप्तच
चांदूरबाजार : निवडणूक प्रक्रियेतील कर्मचार्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी 'टपाली मतदानाची सुविधा दिली जाते. त्यासाठी आवश्यक अर्ज स्वीकारले जातात. ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही या कर्मचार्यांना अद्यापही 'टपाली मतपत्रिका' प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेकडो कर्मचारी मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
चांदूरबाजार येथील १३ उर्दू शिक्षकांचा निवडणूक प्रक्रियेत समावेश असून त्यांनी मतदानापासून वंचित ठेऊ नये, अशी विनंती केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. टपाली मतपत्रिका उपलब्ध करून द्यावे, यासंबंधीचे निवेदन त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, विभागीय आयुक्त, जिल्हा निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक अधिकार्यांना दिले आहे. १0 एप्रिल रोजी झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेत या १३ श्क्षिकांना जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर पाठविण्यात आले होते. त्यावेळी त्यांना टपाली मतपत्रिका पाठविण्याची व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. यासाठी ३0 मार्च रोजी झालेल्या प्रशिक्षण कार्यशाळेत या शिक्षकांना पोस्टल बॅलेटसाठी आवश्यक अर्ज देण्यात आले. त्यानुसार हे अर्ज योग्य माहिती भरून देण्यात आले. मतदानानंतर किमान एक आठवड्यापर्यंत टपाली मतपत्रिका या शिक्षकांना मिळणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही १३ शिक्षकांनाच नव्हे तर जिल्ह्यातील शेकडो कर्मचार्यांना टपाली मतपत्रिका प्राप्त झाले नसल्याचे या शिक्षकांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
याबाबत या शिक्षकांनी वेळोवेळी संबंधित अधिकार्यांना टपाली मतपत्रिकेची मागणी केली. मात्र, टपाली मतपत्रिका पाठविण्याची प्रक्रिया सुरू असून वेळेत जिल्ह्यातील इतर कर्मचार्यांना मतपत्रिका प्राप्त होतील, असेच सांगण्यात आले. मात्र, प्राप्त झाले नसल्याने मतदानापासून वंचित राहण्याची भीती या शिक्षकांनी व्यक्त केली आहे. मतमोजणीला केवळ आठवडा शिल्लक असताना या शिक्षकांना टपाली मतपत्रिका मिळेल काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. (तालुका प्रतिनिधी)