अमरावतीत भीषण अपघात: कारच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू... 'हिट अँड रन'चा प्रकार
By प्रदीप भाकरे | Updated: March 16, 2026 08:14 IST2026-03-16T08:13:46+5:302026-03-16T08:14:04+5:30
हिट अँड रनच्या या घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे.

अमरावतीत भीषण अपघात: कारच्या धडकेत बाप-लेकीचा जागीच मृत्यू... 'हिट अँड रन'चा प्रकार
अमरावती: शहराच्या राजापेठ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी चौकात रविवारी मध्यरात्री काळाने घाला घातला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात गजानन श्रीरामजी माकोडे (वय ५२) आणि त्यांची कन्या सपना गजानन माकोडे (वय २४) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांची दुसरी मुलगी प्रियंका ही गंभीर जखमी असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात झाल्यानंतर कारचालकाने पळ काढला, मात्र सोमवारी पहाटे त्याने स्वतःहून राज्यातील पोलीस स्टेशन गाठून आत्मसमर्पण केले. हिट अँड रनच्या या घटनेने अमरावतीत मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तिवसा येथील रहिवासी मुकेश रामचंद्र रावकर हे त्यांच्या साडूच्या (गजानन माकोडे) घरी मायानगर येथे आले होते. सपना माकोडे हिला पुण्याला जाण्यासाठी रात्री १२.१०ची ट्रॅव्हल्स होती. तिला बसवर सोडण्यासाठी गजानन माकोडे हे त्यांच्या दोन्ही मुलींना सपना (२४) आणि प्रियंका (२२) यांना घेऊन स्वतःच्या काळ्या रंगाच्या दुचाकीने एमआयडीसी चौकात पोहोचले.
दिनांक १६ मार्च रोजी रात्री १२.०५च्या सुमारास, नांदगाव पेठकडून बडनेराच्या दिशेने सुसाट वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. अपघातानंतर पोलिसांनी जखमींना तातडीने इर्विन रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासून गजानन माकोडे आणि त्यांची मोठी मुलगी सपना यांना मृत घोषित केले. धाकटी मुलगी प्रियंका हिला पुढील उपचारासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
आरोपी चालक पोलिसांत हजर
या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली आहे. कार चालकाविरुद्ध कलम २८१, १०६(१), १२५(B) बीएनएस आणि मोटार वाहन कायदा कलम १३४, १८५ अंतर्गत गुन्हा (१७७/२०२६) नोंदवण्यात आला आहे. अपघातग्रस्त कारचा चालक स्वतः पोलीस स्टेशनला हजर झाला असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.