हजार रुपयांसाठी इमान विकले ; इर्विनमधील सीएस कार्यालयातील लाचखोर बाबूला ‘ट्रॅप’ करण्यासाठी 'असा' रचला सापडा !
By प्रदीप भाकरे | Updated: September 25, 2025 17:28 IST2025-09-25T17:26:49+5:302025-09-25T17:28:15+5:30
Amravati : एसीबीची कारवाई; मेडिकल बिल मंजुरीसाठी घेतली एक हजारांची लाच

Honesty sold for a thousand rupees; A scheme was found to 'trap' the bribe-taking boss in the CS office in Irvine!
अमरावती : मेडिकल बिल मंजूर करण्यासाठी एक हजाराची लाच घेणाऱ्या बाबूला एसीबीने रंगेहाथ पकडले. राजेश गुलाबराव सानप (४४, रा. मुदलीयारनगर, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. तो इर्विनस्थित जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील नियोजन विभागात कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने २५ सप्टेंबर रोजी दुपारी १२.१५ वाजताच्या सुमारास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात हा लाच सापळा यशस्वी केला.
एफआयआरनुसार, या प्रकरणातील तक्रारदार हे सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी स्वत:सह मुलाच्या आजाराचे मेडिकल बिल त्यांच्या कार्यालयामार्फत जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविले होते. दरम्यान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात मेडिकल बिलाचे कामकाज राजेश सानप हे पाहत असल्याचे त्यांना समजले.
त्यामुळे तक्रारदार हे चौकशीसाठी राजेश सानप यांना त्यांच्या कार्यालयात जावून भेटले. त्यावेळी राजेश सानप यांनी तुमच्या मेडिकल बिलाच्या दोन टक्के रक्कम म्हणजे ४ हजार रुपये द्यावे लागतील, नाहीतर मी काम करणार नाही, असे त्यांना बजावले. त्यामुळे तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने २४ सप्टेंबर रोजी पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत राजेश सानप यांनी तक्रारदार यांना मेडिकल बिल मंजूर करण्यासाठी तडजोडीअंती १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
कोतवालीत गुन्हा
त्यानुसार एसीबीने २५ सप्टेंबर रोजी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सापळा रचण्यात आला. राजेश सानप याने तक्रारदाराकडून १ हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहाथ अटक केली. त्याच्याविरुद्ध कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक मारूती जगताप यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलिमा सातव, अंमलदार उपेंद्र थोरात, शैलेश कडू, आशिष जांभोळे, राजेश बहिरट यांनी केली.